Home
Home चंद्रपूर संवेदनशील माणसांच्या मनातील धग म्हणजे पोईनकरांची कविता – चंद्रकांत वानखडे 🔴...

संवेदनशील माणसांच्या मनातील धग म्हणजे पोईनकरांची कविता – चंद्रकांत वानखडे 🔴 अविनाश पोईनकर यांच्या ‘दंडकारुण्य’ कवितासंग्रहाचे लोकार्पण व चर्चा

By : Shankar Tadas
चंद्रपूर :

वर्तमानातील भ्रम आणि भयाचे राजकारण, २०१४ नंतर मिळालेल्या स्वातंत्र्यानंतरचा कालखंड, सध्याच्या देशभक्त संघटना पुन्हा समाजाला गुलामीकडे ढकलत आहेत. या काळात अविनाश पोईनकर या कार्यकर्त्या कवीच्या कवितेतील आग, धग, कोणत्याही संवेदनशील माणसाला जाणवेल अशीच आहे. मी संवेदना बधिर कधीच नव्हतो. त्यामुळे कविता निरक्षर असूनही अविनाश पोईनकरांची कविता मला भीडली. संवेदनशील माणसांच्या मनातील धग ही कविता असल्याचे प्रतिपादन नागपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत चंद्रकांत वानखडे यांनी व्यक्त केले.

फिनिक्स साहित्य मंच चंद्रपूर व अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान राजुरा आयोजित लोकवाड्मय गृह प्रकाशित कवी अविनाश पोईनकर यांच्या ‘दंडकारुण्य’ कवितासंग्रहाचा लोकार्पण व चर्चा सोहळा नुकताच चंद्रपुरात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी साहित्य अकादमी दिल्लीचे सदस्य व नागपूर येथील प्रसिद्ध समीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे, गडचिरोलीतील प्रसिद्ध कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या कुसुम अलाम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवे, प्रसिद्ध रंगकर्मी डॉ.जयश्री कापसे-गावंडे उपस्थित होते.

अविनाश पोईनकर यांच्या ‘दंडकारुण्य’ कवितासंग्रहाचे महत्त्व केवळ वाड्मयीन नसून सामाजिक आणि राजकिय अधिक आहे. दंडकारण्यातील विकास, जल-जंगल-जमिन अस्तित्वाचा मुद्दा या कवितेचा गाभा आहे. ही समकालीन प्रभावी कविता संवेदनशील मनाची अस्वस्थ अभिव्यक्ती असून दंडकारण्यातील आदिम वेदनांवर प्रश्न विचारणारी आहे असे मत प्रसिद्ध समीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी व्यक्त केले. आदिवासी जगाचं वास्तव अतिशय समर्थपणे कवितेत उतरलेलं असून या संग्रहाने आदिवासी साहित्य दालनात समृद्धी आणली असे मत गडचिरोली येथील प्रसिद्ध कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या कुसुम अलाम यांनी मांडले.

सगळीकडे सामाजिक शिथिलतेचं वातावरण असताना जाणिवा आणि नेणीवेच्या पल्याड विचार करायला लावणारी ‘दंडकारुण्य’ ही अनुभूती आहे. यावर नाट्यानुभव तयार करणार असल्याचा मनोदय प्रसिद्ध रंगकर्मी डॉ.जयश्री कापसे-गावंडे यांनी व्यक्त केला. आपल्या अंगाला शहारे येतील इतकं जिवंत वास्तव या कवितेतील प्रत्येक नोंदीत आहे. आदिवासी जीवन जाणिवांचा समकाळातील हा ठेवा असल्याचे प्रतिपादन जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन नरेशकुमार बोरीकर, प्रास्ताविक विजय वाटेकर यांनी केले तर आभार ॲड.सचिन मेकाले यांनी मानले. कार्यक्रमाला चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा येथील अनेक साहित्य रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

• अनोखे लोकार्पन आणि पहिली आवृत्तीही संपली.

दंडकारण्यातील वास्तव मांडणारा हा कवितासंग्रह असल्याने सागाच्या पानातून काव्यसंग्रहाचे अनावरण करण्यात आले. मोहवृक्षाला पाणी देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यातून निसर्गमूल्य जपण्याचा संदेश देण्यात आला. शिवाय या कवितासंग्रहाला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत असून कार्यक्रमातच लोकवाड्मय गृह प्रकाशित ‘दंडकारुण्य’ कवितासंग्रहाची पहिली आवृत्तीही संपली. हे विशेष !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here