By : Shankar Tadas
गडचिरोली ::
गडचिरोली जिल्हा प्रशासनाने सिरोंचा परिसरात #अवैधरित्या साठवणूक केलेल्या रेतीची तपासणी करीत सुमारे १५ हजार ६६५ ब्रास अवैध रेतीसाठ्यासह काही वाहने जप्त केली आहेत. याप्रकरणी संबंधितांवर २९ कोटी रुपयांहून अधिक दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.
सिरोंचा विभागात अवैध रेती तस्करीबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याने जिल्हाधिकारी #अविशांत_पंडा यांनी सहायक जिल्हाधिकारी तथा अहेरीचे उपविभागीय अधिकारी कुशल जैन यांना विशेष तपासणी करण्याच्या निर्देश दिले होते.
त्यानुसार चौकशी केली असता अंकिसा माल, चिंतरवेला व मद्दीकुंठा येथून १५ हजार ६६५ ब्रास रेती जप्त करण्यात आली. साठवणूक आणि वाहतुकीसाठी संबंधितांकडे कोणताही वैध परवाना उपलब्ध नसल्यामुळे, हा साठा अवैध घोषित करून जप्त करण्यात आला.
जप्त केलेल्या १५,६६५ ब्रास अवैध साठ्यासाठी प्रति ब्रास ₹ १८,६०० दंड याप्रमाणे एकूण अंदाजित रक्कम २९ कोटी ३६ लाख ५६ हजार ८०० रुपये दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.
अंतिम सुनावणी आणि अपीलाच्या अधीन राहून ही दंडाची रक्कम निश्चित होईल. या सर्व प्रकरणात चौकशी सुरू असल्याचे सहायक जिल्हाधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.
*******
सौजन्य : आकाशवाणी नागपूर, वृत्त विभाग