Home
Home Breaking News मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय – विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचे नवे दार उघडणार”

मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय – विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचे नवे दार उघडणार”

लोकदर्शन चंद्रपूर👉मोहन भारती

चंद्रपूर, दि. १० : जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर होणार आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

आदिवासी बहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात सामील करण्यासाठी हे महाविद्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास आमदार श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. मंत्रालयात तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्याशी यासंदर्भात सविस्तर आणि सकारात्मक चर्चा पार पडली.

मुनगंटीवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना श्री. मुनगंटीवार यांनी मुल येथे शासकीय पॉलिटेक्निक सुरू करण्याचा ठाम निर्धार केला होता. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने त्यांनी तंत्र शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत निर्देश दिले होते. त्याचा परिणाम म्हणून आज प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे जाणार आहे.

युवकांसाठी रोजगाराच्या असंख्य संधी

‘अ‍ॅडव्हांटेज चंद्रपूर’ परिषदेत ७५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. आर्सेलर मित्तल, लॉयड स्टीलसारख्या कंपन्या मुल येथे उद्योग उभारणीसाठी पुढे येत आहेत. या उद्योगांना सुमारे २५ हजार कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षणाने सज्ज विद्यार्थी तयार करण्यासाठी हे महाविद्यालय महत्त्वाचे ठरणार आहे.

विद्यार्थ्यांना होणारा थेट लाभ

या महाविद्यालयामुळे मुलसह पोंभुर्णा, सावली, सिंदेवाही आणि संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोठा लाभ होणार आहे. याआधीच मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय सुरू झाल्याने शैक्षणिक वातावरणात सकारात्मक बदल घडला आहे. पॉलिटेक्निक सुरू झाल्यास मुल हे लवकरच शिक्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here