Home
Home Breaking News चक्क अमावास्येच्या दिवशी लिंगायत माळी समाजाचा सत्यशोधक विवाह! ♦️महात्मा बसवेश्वर व...

चक्क अमावास्येच्या दिवशी लिंगायत माळी समाजाचा सत्यशोधक विवाह! ♦️महात्मा बसवेश्वर व अहिल्याराणी होळकर जयंतीनिमित्त सांगली जिल्ह्यात प्रबोधनात्मक विवाह सोहळा संपन्न

लोकदर्शन सांगली 👉 रघुनाथ ढोक

सांगली / वांगी – फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन, पुणे यांच्या सत्यशोधक केंद्राच्या वतीने आणि सत्यशोधक प्रबोधन महासभा महाराष्ट्राच्या सहकार्याने, सोमवार २६ मे २०२५ रोजी वांगी येथील साईनाथ मंगल कार्यालयात ५३वा मोफत सत्यशोधक विवाह मोठ्या प्रबोधनात्मक वातावरणात संपन्न झाला.

हा विवाह महात्मा बसवेश्वरांची ८९१वी व अहिल्याराणी होळकर यांची ३००वी जयंती लक्षात घेऊन आयोजित करण्यात आला होता. विशेष बाब म्हणजे हा विवाह अमावास्येच्या दिवशी पार पडला, जे पारंपरिक दृष्टिकोनातून विवाहासाठी ‘अशुभ’ मानले जाते. मात्र वधू पूनम माळी (MSc. CS) हिचा वाढदिवस हाच योग्य मुहूर्त मानून, विजय माळी (BA) यांच्याशी विवाह लावण्यात आला.

विवाह सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते – पदवीधर आमदार अरुण लाड, माजी जि.प. अध्यक्ष संग्राम देशमुख, अखिल भारतीय माळी महासंघाचे उपाध्यक्ष विठ्ठल तोडकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील, अ‍ॅड. सुभाष पाटील, हल्ला बोल चित्रपटाचे निर्माते मोहन बनसोडे व अन्य.

या विवाहाचे विधिकर्ते म्हणून सत्यशोधक व महात्मा फुले अनुयायी रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुल्यांच्या वेशात विवाह विधी पार पाडला. विवाहामध्ये महात्मा फुल्यांनी रचलेली मंगळाष्टके गायन करण्यात आली. भारताचे संविधान, महात्मा फुले साहित्य, यांचे पूजन करण्यात आले.

वधू-वरांचे आगमन पारंपरिक वाद्य आणि फुलांच्या पायघड्यावरून करण्यात आले. विवाहानंतर दोघांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र, फुले-दांपत्याची फ्रेम भेट देण्यात आली. त्यांच्या पालकांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले.

सोहळ्यादरम्यान विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित पाहुण्यांना थोर समाजसुधारकांचे ग्रंथ भेट देण्यात आले. अक्षता म्हणून फुलांच्या पाकळ्यांचा वापर करण्यात आला.

या कार्यक्रमाचे संयोजन परशुराम माळी यांनी तर सहकार्य प्रा. प्रतिमा परदेशी, अ‍ॅड. जयराज माळी, डॉ. सुप्रिया सावंत, सुप्रिया व विक्रम माळी, पत्रकार सदानंद माळी व इतर सत्यशोधक कार्यकर्ते यांनी केले. सूरसंगम ऑर्केस्ट्राच्या सौ. नीता आणि श्री. संतोष वरूडेंनी सादर केलेल्या महापुरुषांवरील गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली.

हा विवाह केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, तर अंधश्रद्धा, जात, कर्मकांड यांच्या विरोधात उभी असलेली एक प्रबोधनपर चळवळ होती. त्यामुळे परिसरात या ऐतिहासिक विवाहाची विशेष चर्चा रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here