लोकदर्शन 👉मोहन भारती
गोंडपिपरी, दि. ०४ :
भारतीय जनता पक्ष (भाजप) ची विचारधारा घराघरांत पोहोचवून संघटन अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सातत्याने कार्यरत राहावे, असे आवाहन राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी केले. केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच पक्षाचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील श्रीक्षेत्र धाबा येथील संत परमहंस कोंडया महाराज संस्थानच्या सभागृहात आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेचा पहिला दिवस उत्साहात पार पडला.
मार्गदर्शन करताना आमदार भोंगळे म्हणाले की, पक्ष संघटना ही समाजापासून वेगळी नसून समाजाच्या गरजा ओळखून राष्ट्रीय विचारांना जनजीवनाचा भाग बनवणे गरजेचे आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ स्तरावर संघटन अधिक मजबूत करून विकासाच्या प्रवासात सर्वांचा सहभाग सुनिश्चित करावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यशाळेत विविध विषयांवर तज्ज्ञ वक्त्यांनी सत्रांद्वारे मार्गदर्शन केले. यामध्ये श्रीकांत देशपांडे यांनी भाजपची वैचारिक भूमिका, संजय गजपुरे यांनी पक्षाचा इतिहास व वाटचाल, साकेत भानारकर यांनी कार्यपद्धती, तर तनय देशकर यांनी सोशल मीडिया व ए.आय. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या विषयांवर माहिती दिली.
या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा, महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष दीपक सातपुते तसेच विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





