Home
Home राजुरा राजुरात काँग्रेस–शेतकरी संघटनेची वज्रमूठ! अरूण धोटे नगराध्यक्षपदाचे उमेदवार; काँग्रेस १२ तर शेतकरी...

राजुरात काँग्रेस–शेतकरी संघटनेची वज्रमूठ! अरूण धोटे नगराध्यक्षपदाचे उमेदवार; काँग्रेस १२ तर शेतकरी संघटना ९ जागांवर लढणार

लोकदर्शन राजुरा 👉मोहन भारती

राजुरा नगर परिषद निवडणुकीसाठी अखेर काँग्रेस आणि शेतकरी संघटनेच्या वज्रमूठीची अधिकृत घोषणा करण्यात आली. ११ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी संकुल, राजुरा येथे झालेल्या संयुक्त सभेत या ऐतिहासिक युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. युतीनंतर दोन्ही पक्षांनी एकदिलाने निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला असून, नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अरूण धोटे हे उमेदवार असतील, अशी घोषणा करण्यात आली. काँग्रेस १२ तर शेतकरी संघटना ९ जागांवर उमेदवार उभे करणार आहेत.

या सभेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप होते. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, निळकंठराव कोरांगे, अरूणभाऊ धोटे, स्वामी येरोलवार, ॲड. कुंदा जेनेकर, ॲड. दिपक चटप, दिनकर कर्नेवार, विकास देवाळकर, सुरज ठाकरे, सिध्दार्थ पथाडे, रमेश नळे, दिलीप देठे, हरजितसिंग संधू, निर्मला कुडमेथे, संध्या चांदेकर, नरेंद्र काकडे, संतोष इंदूरवार, घनश्याम हिंगणे, कोमल फुसाटे यांसह काँग्रेस व शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सभेत बोलताना ॲड. वामनराव चटप म्हणाले की, “सन २००१ मध्ये नगर विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही विरोधकांना एकही जागा जिंकू दिली नव्हती. आता पुन्हा त्याच एकतेने आणि जिद्दीने राजुराच्या विकासासाठी ही युती लढेल.” त्यांनी भाजपच्या शेतकरीविरोधी धोरणांवर टीका करत, “राजुरा शहरातील जनतेला न्याय मिळावा म्हणून ही युती झाली,” असे सांगितले.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी यावेळी भाजपवर जोरदार निशाणा साधत, “देशातील अराजकता, शेतकरी आणि कामगारांवरील अन्याय पाहता आता जनतेने भाजपला धडा शिकविण्याची वेळ आली आहे,” असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन काँग्रेसचे जिल्हा महासचिव एजाज अहमद यांनी केले. सभेत सर्व उमेदवारांचा परिचय करून देण्यात आला. काही इच्छुकांना उमेदवारी देता आली नसली तरी सर्वांनी युतीच्या विजयासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

सभेला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ठिकठिकाणी टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणांनी वातावरण दणाणून गेले. या युतीमुळे राजुरा नगर परिषद निवडणुकीचा सामना अधिक चुरशीचा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here