*ध. जवळका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कवी संमेलन संपन्न*

 

लोकदर्शन पाटोदा :- 👉राहुल खरात

बीडजिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मौजे धनगर जवळका या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले असुन दि. १३/०४/२०२४ रोजी सायंकळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बीड जिल्हा यांचे वतीने कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष अँड. विशाल मस्के, तसेच पाटोदा तालुक्यातील साहित्यिक संजय सावंत, हरीभगत किशन, परशुराम सोंडगे, बाळासाहेब नागरगोजे, अंकुश नागरगोजे इ. कवींनी उपस्थिती दर्शवुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेवर आधारित कवितांचे बहारदार सादरीकरण केले.

यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बीड जिल्हाध्यक्ष अँड. विशाल मस्के यांनी त्यांची युट्युबवर प्रसिद्ध असलेली “हे राष्ट्र निर्मात्या,सलाम तुजला मानाचा” हि कविता सादर केली, त्यातील काही ओळी

“भीमराव रामजी आंबेडकर, ठरला सुर्य ज्ञानाचा
हे राष्ट्र निर्मात्या, सलाम तुजला मानाचा
विस्कटलेला समाज सारा, वेचलास एकाच राष्ट्री
दिधलं संविधान या देशा, जागुन रात्री च्या रात्री
ठरलास पालनकर्ता, कोटी कोटी जनांचा
हे राष्ट्र निर्मात्या, सलाम तुजला मानाचा”

कार्यक्रमातील कवी संजय सावंत यांनी ” जगामध्ये सार्या हुषार तो हिरा” हि कविता तालासुरात गायन करून सादर केली, त्यातील काही ओळी

“जगामध्ये सार्या हुषार तो हिरा
ज्ञानाचा दिवा होता माझा भीमराया
शिक्षणाचा नारा देत होता सारा
जगामधी ज्ञानी होता निखळ तो तारा

तसेच कवी हरीभगत किशन यांनी जव्हा नवीन पोपट हा या गाण्याच्या चाली वर ” अमर कार्य माझ्या भीमाचे” ही कविता तालासुरात गायन केली त्यातील काही ओळी

अमर कार्य माझ्या भीमाचे
साधीले हित त्यांनी दीनांचे
भीमरायाच्या पुण्याइने
लागलेत तरायला

कवी परशुराम सोंडगे यांनी ए क्रांतीसुर्या ही कविता सादर केली त्यातील काही ओळी

तूच येना सूर्य तळहातावर घेऊन
तेव्हाच्या सारखा
का मीच घेऊ
हाती पेटती मशाल….

त्यानंतर कवी बाळासाहेब नागरगोजे यांनी तांडव ही कविता सादर केली, त्यातील काही ओळी

लक्तरांच्या अस्तव्यस्त बेवारस रेषा
असिम वेदना आणि जन्माला आल्याची शिक्षा भोगणारे मातृ प्राय डोळे
शब्दांचे जळालेले अंकुर आणि फितुर उजेडानेही ओरबाडलेले चेहरे

त्याचबरोबर कवी अंकुश नागरगोजे यांनी “बाबासाहेबांनी आम्हाला जाणवलं” ही कवीता सादर केली, त्यातील काही ओळी

इथे जन्मले साधू संत
साहेबा सारखे कोणी नाही ज्ञानीवंत
करू आपण साहेबांचा आदर्श
त्यांचे कार्य ठेवू सर्वजण जिवंत

अशाप्रकारे मौजे धनगर जवळका येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बीड जिल्हा व सार्वत्रिक भीम जयंती उत्सव समिती धनगर जवळका यांचे संयुक्त विद्यमाने कवी संमेलन पार पडले, कवी संमेलनाचे सुत्रसंचलन कवी परशुराम सांडगे यांनी केले, यावेळी गावातील नागरिकांसह इतर ही लोक कवी संमेलनासाठी उपस्थित राहिले होते, सर्वच कविंच्या कवितांना ऊत्तुंग असा प्रतिसाद देत यावेळी रसिक जनतेने कवी संमेलनाचा आस्वाद घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here