पांढरपौणीत अवैध दारू बंद मात्र बसस्थानक व साईडींगवर सुरूच. ♦️अवैध दारू पकडण्यास गेलेल्या महिलांना धक्काबुक्की : एक महिला जखमी. ♦️पोलीसांच्या उपस्थितीत एका विक्रेत्याच्या घरी सापडला रिकाम्या दारू बाटलांचा ढिग.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– तालुक्यातील मौजा पांढरपौणी येथे सर्रासपणे अवैध दारू विक्री सुरू असल्याने, दारूच्या विळख्यात गावातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी सापडल्यामुळे गावातील तरूण पिढी, नागरिक बरबाद होत आहेत, मोठ्या कष्टाने मोलमजुरी करून कमावलेले पैसे दारूत मातीमोल झाल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर पडत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी गावातील ग्रामपंचायत, ग्रामस्थांना सोबत घेऊन स्थानिक महिलांनी या विरोधात यलगार पुकारला. काल पांढरपौनी गावातून भव्य मोर्चा काढत, अवैध दारू बंद झालीच पाहिजे अशा घोषणा देत राजुरा शहर गाठून पोलीस ठाणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाला घेराव घातला. येथील अधिकाऱ्यांना गावातील अवैध दारू बंद करण्याचे निवेदन देत पूर्णपणे अवैध दारू बंद करण्यात यावी अन्यथा या विरोधात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. कालच्या या घटनाक्रमाची माध्यमांनी दखल घेत वृत्त प्रकाशित केले. समाज माध्यमातून रोष व्यक्त होऊ लागला. त्याचा परिणाम होऊन पांढरपौनी गावांमध्ये सुरू असलेले जवळपास सर्वच अवैध दारू विक्री केंद्रे तातडीने बंद झालित मात्र ही अवैध दारू बंदी केवळ फार्स ठरते की काय असे वाटायला लागले आहे. कारण गावापासून थोड्याच अंतरावर असलेले बसस्थानक आणि पांढरपौनी साईडिंग येथे मात्र अवैध दारू विक्रेत्यांनी आपला मोर्चा वळवला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरूच आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे आज गावात सुरू असलेल्या या अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी स्वतः महिलांनीच पुढाकार घेऊन गस्त वाढवली. या दरम्यान सकाळी १० : ३० च्या सुमारास गावातील एका अवैध दारू विक्रेत्याच्या घरून दारूच्या बाटला पोत्यात भरून बुलेट गाडीवर घेऊन जाणाऱ्या काही तरुणांना पकडण्याचा प्रयत्न स्थानिक महिलांनी केला. मात्र या तरुणांनी महिलांच धक्काबुक्की करून पळ काढला. यात एक महिला जखमी झाली आहे. या घटने नंतर गावकर्‍यांनी राजुरा पोलीस ठाण्यात सुचना केली असता संबंधितांनी आपण फक्त कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करू शकतो असे सांगितले मात्र पोलिसांकडून तातडीने मदत होत नसल्याने स्थानिक जनतेत कमालीचा असंतोष पहायला मिळत आहे.
यानंतर कुठे माशी शिंकली की काय तासाभरात पोलिसांची जिप्सी गावात आली. दरम्यान पोलीस यायच्या आधी महिलांना एका अवैध दारू विकणाऱ्या महिलेला ग्रामपंचायत मध्ये पकडून ठेवले होते आणि पोलिस आल्यावर अवैध दारू विक्रेत्या महिलेच्या घरात देशी विदेशी दारूच्या रिकाम्या बाटलांचा ढिगच आढळून आला तर काही दारूच्या बाटल्या सापडल्याचेही महिलांनी सांगितले. पोलीस विभाग आता त्या महिलेसह इतर चार ते पाच अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन चौकशी केली मात्र स्थानिकांच्या म्हणण्यानुसार महिलांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आणि पोलीस कारवाई होण्याच्या शक्यतेने सर्व अवैध दारू विक्रेत्यांनी जवळील स्टाक अन्यत्र हलविला तसेच घराशेजारी असलेल्या रिकाम्या बाटल्यांची विल्हेवाट लावली असल्याने पोलिसांच्या हाती फारसे काही सापडले नाही. त्या महिलेच्या घरून बुलेटवर दारू घेऊन जाणारे ते तरूण गडचांदूर येथील असून त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीशी संबध आहे का याचाही शोध घेऊन कठोर कारवाई होण्याची आवश्यकता असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले. त्या बुलेटचा नंबरही गावकर्‍यांनी पोलीसांना सांगितल्याचे कळते.
एकंदरीत अवैध दारू विक्रीला लगाम घालण्यासाठी गावातील महिलांनी चंग बांधला असून महिलांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. मात्र अवैध दारू विक्रेत्यांवर तातडीने ठोस कारवाई न झाल्यास त्यांचे मनोबल वाढून येणाऱ्या काळात विरोध करणाऱ्यांपैकी काही निवडक नागरिकांवर हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागाची असेल असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *