विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामगारांचे सीडब्लूसी भेंडखळ कंपनीच्या विरोधात साखळी उपोषण सुरु ♦️ 502 स्थानिक प्रकल्प कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड ♦️सतत 15 वर्षे काम करूनही कामगारांच्या मागणीकडे कंपनी प्रशासनाचे दुर्लक्ष

 

लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे

उरण दि. 27 उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्‌दीतील कार्यरत असणा-या पोलारीस लॉजिस्टिक पार्क (सी डब्ल्यु.सी) कंपनीने येथील स्थानीक भूमीपुत्र असलेल्या कामगारांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ तसेच कामगारांच्या विविध मागण्य पूर्ण होत नसल्याने हुकूमशाही पद्धतीने कामगारांवर अन्याय करणाऱ्या पोलारीस लॉजिस्टीक पार्क (सी.डब्लू.सी) कंपनी प्रशासन विरोधात रायगड श्रमिक संघटना, न्यू मेरिटाईम अँण्ड जनरल कामगार संघटना यांच्या नेतृत्वाखाली सी डब्लू सी लॉजिस्टीक पार्क नोकरी बचाव कामगार समिती भेंडखळच्या माध्यमातून कामगारांनी सोमवार दि 27 फेब्रुवारी 2023 पासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरवात केली आहे.

 

गेली 15 वर्षांपूर्वी हिंद टर्मिनल कंपनी काम करत असताना महिन्याला 12000 ट्यूज कंटेनर हातळणीचा व्यवसाय करीत होती. तसेच सी.डब्ल्यू.सी. कंपनीच्या नियमानुसार सर्व क्षेत्रफळ न वापरता हिंद टर्मिनल कंपनी भरमसाठ भाडे (58 करोड ) देऊन सुद्धा 502 कामगारांना भरघोस पगार देत होती व त्या पगारात कामगारांचे घर खर्च सुरळीत चालत होते. आता मात्र पोलारीस लॉजिस्टिक्स पार्क कंपनीला सीडब्ल्यूसी कंपनीने भरमसाठ असलेले भाडे (25 करोड पर्यंत) कमी करत व कंपनीतील सर्व क्षेत्रफळ वापरण्यास परवानगी दिलेली आहे. कंपनीचा कामाचा व्याप मागच्या कालावधी पेक्षा सध्या कामाचा व्याप जास्त दुपटीच्या प्रमाणात आहे. तरीसुद्धा कंपनीने कामगार व कामगारांच्या पगारात 60 टक्क्यांनी कपात केली असून कंपनी एक प्रकारे कामगारांवर जाणीवपूर्वक अन्याय करीत आहे. तरीसुद्धा स्थानिक भूमीपुत्र असलेल्या कामगारांनी आपली कंपनी सुरळीत चालू होण्यासाठी काही तात्पुरत्या अटी मान्य केल्या आहेत. परंतु त्यानंतर कामगारांच्या वतीने मागणी केली आहे की, जो जुना पगार चालू होता तो पगार आम्हाला दर सहा-सहा महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने दोन वर्षांच्या कालावधीपर्यंत जुन्या पगाराची बरोबरी करावी व जुन्या पद्धतीने कामगार बदली नियम चालू ठेवावा. तसेच उर्वरित राहिलेल्या स्थानिक कामगारांना काही कालावधीमध्ये समाविष्ट करून घेणे.अशी कामगारांची मागणी आहे.कामगारांना जुना पगार 32000 ते 40,000 पर्यंत पगार होता. आता पोलारीस कंपनीने नव्याने कारभार करायला घेतल्याने 15 वर्षे जुने असलेल्या कामगारांना 12000 रुपये सध्या कंपनी प्रशासन पगार देणार आहे. परंतु कामगारांचे म्हणणे असे आहे की जुना पगार 2 वर्षात पूर्ण करा. थोडे थोडे करून जुना पगार पूर्ण द्यावा. मात्र कंपनी प्रशासन हि कामगारांची मागणी मान्य करायला तयार नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने शासनाच्या सर्वच विभागात कायदेशीर मार्गाने पत्रव्यवहार देखील केले. मात्र कामगारांच्या मागण्या मान्य होत नसल्याने शेवटी 502 कामगारांनी रायगड श्रमिक संघटना तसेच न्यू मेरिटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटना यांच्या नेतृत्वाखाली सी. डब्लू. सी लॉजिस्टिक पार्क नोकरी बचाव कामगार समिती भेंडखळच्या माध्यमातून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी बेमुदत साखळी उपोषणाचा पहिला दिवस होता.पहिल्याच दिवशी सर्व कामगार, कामगारांचे कुटुंब पोलारीस लॉजिस्टिक कंपनी, भेंडखळच्या गेट समोर मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर साखळी उपोषण हे सर्वपक्षीय असून या साखळी उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, जेएनपीएचे माजी विश्वस्त तथा कामगार नेते भूषण पाटील, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील,सरपंच मंजिता मिलिंद पाटील आदींनी साखळी उपोषण स्थळी हजर राहून आपले मनोगत व्यक्त करून जाहीर पाठिंबा दिला. विविध राजकीय पक्षांनी या साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला असल्यामुळे सदर साखळी उपोषण अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

 

कोट (चौकट ):-

सी. डब्ल्यू.सी. लॉजिस्टिक पार्क कंपनीमध्ये पोलारीस लॉजिस्टिक्स पार्क कंपनी भाडे करारावर चालवण्यासाठी आलेली आहे. सदर कंपनी व्यवस्थापना बरोबर कामगार व ग्रामपंचायत कमिटी सोबत अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत, परंतु त्या सर्व बैठकीत कामगारांच्या बाजूने समाधानकारक चर्चा झालेली नाही.कामगारांना अजूनही योग्य न्याय मिळालेला नाही.
-किरण घरत, कामगार

 

पोलारीस कंपनी प्रशासनाने उरण मधील स्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय केला आहे. कामगार हा महत्वाचा घटक आहे. मात्र कामगारांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण होत नसल्याने मी या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे. कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे. त्याशिवाय मागे हटणार नाही.
-भूषण पाटील
कामगार नेते तथा जेएनपीए माजी विश्वस्त.

पोलारीस कंपनी प्रशासनाने जर कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर कायदेशीर मार्गाने लढून कामगारांचे न्याय व हक्क त्यांना मिळवून देणारच. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सदर साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा आहे. आम्ही नेहमी कामगारांच्या पाठीशी आहोत.कोणत्याही कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही.
-प्रशांत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रदेश सरचिटणीस.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *