Coronavirus 2nd Wave: हा आठवडा सांभाळा! सर्वोच्च आकडेवारीचा ‘हाय अलर्ट’, नंतर अशी कमी होणार रुग्णसंख्या

06 मे लोकदर्शन 👉 मोहन भारती

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने (Corona Second Wave) देशात विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात कोरोना संक्रमित (Corona in India) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची दुसरी लाट नेमकी किती काळ राहील याविषयी सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येविषयी सरकारचे गणित मॉडेलिंग तज्ज्ञ प्रोफेसर एम. विद्यासागर (Professor M. Vidyasagar)  यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाची दुसरी लाट 7 मे रोजी शिगेला (Corona Peak) पोहचण्याची शक्यता आहे. देशाच्या आरोग्य क्षेत्राने यासाठी पूर्ण तयारी ठेवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रा. विद्यासागर म्हणाले की, या आठवड्यात कोरोना शिगेला पोहचण्याचीच शक्यता आहे. यानंतर कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट नोंदविली जाईल. विशेषत: 7 मे ही कोरोना शिगेला पोहचण्याची गणितीय तारीख आहे. मात्र, प्रत्येक राज्यात परिस्थिती किंचित बदललेली दिसू शकते. प्रत्येक राज्यात कोरोना पीक गाठायची वेळही थोडी वेगळी असू शकते, परंतु संपूर्ण देशात कोरोनाची आकडेवारी जसजशी वाढत आहे, तसतसे कोरानाची लाट शिखरावर आहे किंवा त्याच्या अगदी जवळ आहे, हे निश्चित.

प्रोफेसर विद्यासागर यांनी कोरोनाचे शिखर आणि घट याबद्दल दिलेली माहिती देशासाठी मोठा दिलासा देणारी ठरू शकते. सध्या कोरोनाची दुसरी लाट देशात खूप धोकादायक सिद्ध झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या इतकी झपाट्याने  वाढली आहे की, रुग्णालयात बेडही मिळत नाहीत आणि बेड मिळालेल्यांना ऑक्सिजन पुरवण्यास आरोग्य यंत्रणा  सक्षम नाही.

विद्यासागर म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती समजून घेण्यासाठी सरासरी सात दिवसांच्या कालावधीत कोरोनाची स्थिती पाहण्याची गरज असते. दररोज कोरोनाचे आकडे कमी होत आहेत. परिणामी, आपण फक्त ढोबळमानाने संख्येकडेच पाहू नये तर रोजच्या प्रकरणांच्या सरासरीकडे देखील पाहणे गरजेचे आहे. कोरोनाच्या आकडेवारीवर मी जितके काम केले आहे, त्यावरून मी सांगू शकतो की या आठवड्याच्या शेवटी रुग्णसंख्या कमी होऊ लागेल.

⭕मे नंतर सर्व राज्यांमधील स्थिती सुधारलेली दिसेल

कोरोनाची शिखरावस्था प्रत्येक राज्यात वेगवेगळी असेल. शिखरावस्था म्हणजे एखाद्या ठिकाणी कोरोना रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च आकडेवारी पाहायला मिळणं. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रातून सुरू झाली. अशा परिस्थितीत कोरोनाची शिखरावस्था तेथे आधी येईल आणि रुग्णांची संख्याही येथे आधी कमी होऊ शकेल. महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यांची अवस्थाही तशीच असेल कारण महाराष्ट्रामुळे कोरोनाची आकडेवारी येथे जास्त असेल. महाराष्ट्रापासून दूर असणारी राज्ये अगदी हळू हळू शिखरावस्थेत येतील आणि त्यानंतर घसरणही होऊ लागेल. मे महिन्यानंतर कोणतेही राज्य शिखरावस्थेवर येण्याची शक्यता नाही, असे प्रोफेसर विद्यासागर यांनी त्यांच्या अभ्यासानुसार सांगितले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *