लोकदर्शन मुंबई 👉मोहन भारती
मुंबई, दि. 14 मे २०२६ : राज्य शासनाने नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ व जलद मिळाव्यात यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, “आपले सरकार” पोर्टलवरील विविध सेवांसाठी आता शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र (Self-Declaration) स्वीकारण्याचे निर्देश जारी केले आहेत. यासंदर्भात महसूल व वन विभागाने शासन पत्र काढले आहे.
महसूल व वन विभागाच्या 14 मे २०२६ रोजीच्या पत्रानुसार, “Governance Process Re-engineering (GPR)” अंतर्गत शासकीय सेवांचे सुलभीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार काही सेवांमध्ये अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
शासनाच्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, अर्जदारांची ओळख आधार (Aadhaar) प्रमाणीकरणाद्वारे OTP पडताळणी करून निश्चित केली जाणार आहे. तसेच अर्ज ऑनलाइन किंवा “आपले सरकार सेवा केंद्र” मार्फत सादर करता येणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, यापुढे ऑनलाइन अर्ज करताना स्वतंत्र शपथपत्र सादर करण्याची सक्ती राहणार नाही. त्याऐवजी स्वयंघोषणापत्राची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदारांकडून इतर कोणत्याही स्वरूपात शपथपत्राची मागणी करू नये तसेच शपथपत्र नसल्याच्या कारणावरून अर्ज नामंजूर करू नयेत, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत.
हे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच “आपले सरकार सेवा केंद्र” चालकांनी त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सदर पत्रावर सह सचिव कैलास गायकवाड यांच्या स्वाक्षरी असून, शासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांना कागदपत्रांची पूर्तता करताना होणारा वेळ व खर्च कमी होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





