रात्री १० नंतर डीजे व साउंड सिस्टिम वाजवल्यास होणार कठोर कारवाई ; आयोजकांसह मालकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा
लोकदर्शन राहुरी :👉कैलास पुरी
अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी रविवार दिनांक 11 मे 2026 रोजी राहुरी तालुक्यातील साउंड सिस्टिम चालक, मालक तसेच मंगल कार्यालय चालकांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
या बैठकीत रात्री 10 नंतर कोणत्याही प्रकारचे डीजे, साउंड सिस्टिम, वाद्य, फोटोग्राफी अथवा व्हिडिओग्राफीसाठी ध्वनीवर्धक यंत्रणा वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित साउंड सिस्टिम चालक, मालक, मंगल कार्यालय चालक तसेच कार्यक्रम आयोजक व ग्राहकांवर ध्वनी प्रदूषण कायदा 2002 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नागरिकांनी कायद्याचे पालन करून ध्वनी प्रदूषण टाळावे व सामाजिक शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी केले.





