लोकदर्शन मुंबई | 👉 महेश्वर तेटांबे
चंदेरी दुनियेतील कलाकार जेव्हा हातात बॅट आणि चेंडू घेतात, तेव्हा मैदानावरही मनोरंजनाचा चौकार-षटकार रंगतो. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना एकत्र आणणाऱ्या बहुचर्चित “रंगकर्मी क्रिकेट लीग” (RCL) स्पर्धेच्या अधिकृत ट्रॉफी आणि टी-शर्ट लॉन्चिंग सोहळ्याचा दिमाखदार कार्यक्रम नुकताच मुंबईत उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला श्री. श्रीकांत भारतीय आणि श्री. मंगेश सांगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कलाकारांमधील एकोपा, मैत्री आणि खिलाडूवृत्ती वाढीस लावण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन ही काळाची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
यंदाच्या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे संघांचे नेतृत्व करणारे दिग्गज कलाकार. विजय पाटकर, सागर कारंडे, हरीश दुधाडे, कांचन पगारे, संचित यादव आणि नूपुर दुधवडकर हे कलाकार मैदानात आपली रणनीती आखण्यासाठी सज्ज झाले असून, त्यांच्या सहभागामुळे प्रेक्षकांमध्ये स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संचित यादव आणि शितल कल्लापुरे यांनी विशेष परिश्रम घेतले. सोहळ्यात आकर्षक चकाकणारी ट्रॉफी आणि खास डिझाइन केलेले टी-शर्ट्स हे मुख्य आकर्षण ठरले.
या उपक्रमाला पंडित राठोड, सचिन खांडागळे, संदीप राठोड, गणेश गारगोटे, ओमकार सर आणि अखिलेश चौबे या प्रायोजकांनी भक्कम पाठबळ दिले आहे.
“केवळ अभिनयच नाही, तर मैदानावरही आमची मैत्री आणि एकता दिसावी, हाच या लीगचा मुख्य उद्देश आहे,” अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.
क्रिकेटप्रेमी आणि कलाकारांच्या चाहत्यांसाठी ही स्पर्धा एक पर्वणी ठरणार असून, लीगचे सामने १४ आणि १५ मे २०२६ रोजी मुंबईतील परळ सेंट्रल रेल्वे ग्राऊंड येथे रंगणार आहेत. अंतिम सामना हा स्पर्धेचा विशेष आकर्षणबिंदू असणार आहे.
आपल्या आवडत्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते परळच्या खेळपट्टीकडे… कोण उंचावणार विजयाची ट्रॉफी?





