Home
Home वरोरा अमरावती (वलगाव ) येथे १६ ते २२ मे दरम्यान ७ दिवसीय मिशन...

अमरावती (वलगाव ) येथे १६ ते २२ मे दरम्यान ७ दिवसीय मिशन आयएएस शिबिर

By : Rajendra Mardane
*वरोरा* : डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीच्या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधत आयएएस तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास, मार्गदर्शन व संस्कार घडविण्याचे उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी, श्री प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व त्रिवेणी फांउडेशन अमरावती यांच्या सहकार्याने येत्या १६ मे ते २२ मे या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील सिकची रिसॉर्ट येथे मिशन आयएएस राष्ट्रीय स्पर्धा, परीक्षा संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी महाराष्ट्रातील अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, आयएएस, आयपीएस अधिकारी व तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अमरावती विभागाचे डीआयजी रामनाथ पोकळे, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, खासदार डॉ. अनिल बोंडे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम, आयपीएस अधिकारी सागर भामरे, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, अपर आयुक्त राजेश खवले, उपायुक्त महेबूब कासार, उपायुक्त गजानन खानंदे, गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे तसेच अबुधाबीचे संशोधक प्रा. डॉ. चंद्रशेखर मुरादे यांचा समावेश आहे.
या शिबिरात महाराष्ट्रभरातील १० ते २० वयोगटातील स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणारे तसेच व्यक्तिमत्त्व विकास साधू इच्छिणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
शिबिरासाठी नाममात्र शुल्कात विद्यार्थ्यांच्या राहण्याची, भोजनाची व प्रशिक्षणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे.
यापूर्वी मिशन आयएएस उपक्रमामध्ये महाराष्ट्राचे अनेक मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, आयएएस-आयपीएस अधिकारी तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरू सहभागी झालेले आहेत. “बारावी फेल” या प्रेरणादायी कथेमुळे चर्चेत आलेले आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्यासह आतापर्यंत ३७३ आयएएस, आयपीएस व राजपत्रित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
अकादमीमार्फत विद्यार्थ्यांना केवळ एक रुपया प्रतिदिन या अल्प शुल्कात दुसरीपासून स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये पुस्तके व टेस्ट सिरीज विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात. महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांतील सुमारे २३ हजार ५०० विद्यार्थी या उपक्रमाशी जोडले गेले आहेत.
संस्थेने देशभरात १८ हजारांहून अधिक स्पर्धा परीक्षा कार्यशाळांचे आयोजन केले असून, स्पर्धा परीक्षांवर आधारित ७३ पुस्तके प्रकाशित केली आहेत. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, ग्रंथालय, निवास, भोजन व विद्यावेतनाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते.
या सात दिवसांच्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी माहिती, मुलाखत तंत्र, ग्रुप डिस्कशन, सेव्हन हॅबिट्स, व्यक्तिमत्त्व विकास यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय प्रशासकीय कार्यालयांना शैक्षणिक भेटी देऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशासनाची माहितीही दिली जाणार आहे.
संस्थेच्या या उपक्रमाला देशभरातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रासह १९ राज्यांमध्ये मिशन आयएएस अंतर्गत कार्य सुरू आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी, नोंदणीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोडे संचालक, मिशन आयए एस, प्रा. पल्लवी नरेशचंद्र काठोडे, सचिन माळकर, अमरावती, भ्रमणध्वनी
९८९०९६७००३., ९८२३२९४३२६, ७ ८७५७१३९७५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here