चोरशिवनी-हडसती परिसरात मोटार चोरीचा सुळसुळाट; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

लोकदर्शन चंद्रपूर 👉डॉ.नंदकिशोर मैंदळकर

चंद्रपूर, प्रतिनिधी : पठाणपुरा गेटपासून काही अंतरावर असलेल्या चोरशिवनी व हडसती या गावांमध्ये अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटारी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून अद्याप चोरट्यांचा माग काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

चोरशिवनी येथील शेतकरी संतोष पहानपटे तसेच हडसती येथील शेतकरी उमाटे यांच्या शेतातील चालू स्थितीतील इलेक्ट्रिक मोटारी रात्रीच्या सुमारास चोरीस गेल्या. या मोटारींच्या मदतीने रब्बी हंगामातील पिकांना पाणीपुरवठा सुरू होता.

या घटनेमुळे मुग, मटकी, सोयाबीन, हरभरा, ज्वारी तसेच भाजीपाला यांसारखी पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि कमी उत्पादनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असताना या चोरीच्या प्रकारामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांवर आधीच कर्जाचा डोंगर असून हातातोंडाशी आलेले पीक वाळताना पाहून त्यांची अवस्था बिकट झाली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे जगणे अधिक कठीण झाले असून प्रशासनाने तातडीने चोरट्यांचा शोध घेऊन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here