लोकदर्शन 👉मोहन भारती
भद्रावती/चंद्रपूर, प्रतिनिधी (दि. १ मार्च २०२६):
धानोरा चौक ते गडचांदूर-राजुरा मार्ग जिवती-तेलंगणा मार्गाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते इबादुल सिद्दीकी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून रस्ता अरुंद असल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मार्गावर अनेक नागरिकांना अपघातात जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या असून प्रवास करताना नागरिकांना मोठा धोका निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
धानोरा चौक ते गडचांदूर-राजुरा हा मार्ग जिवती व तेलंगणा राज्याशी जोडणारा महत्त्वाचा संपर्क मार्ग असल्यामुळे या रस्त्याचे चौपदरीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सिद्दीकी यांनी निवेदनात म्हटले आहे. रस्ता चौपदरी झाल्यास वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवास करता येईल तसेच अपघातांचे प्रमाणही कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या संदर्भात केंद्र सरकारने तात्काळ कार्यवाही करून रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
—





