लोकदर्शन धाराशिव 👉 राहुल खरात
धाराशिव – दि. ४ ऑक्टोबर:
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा केला जात आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, स्पर्धा आणि सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज, ४ ऑक्टोबर रोजी या सप्ताहाचे व अभिजात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत कार्यक्रमाचे उद्घाटन धाराशिव येथील मराठवाडा साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मा. नितीन तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
उद्घाटनाच्या प्रारंभी मान्यवरांनी शिक्षक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. प्रमुख पाहुणे मा. नितीन तावडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा अनेक वर्षांचा संघर्ष होता, आणि आता या भाषेचे संवर्धन हे फक्त शासनाचेच नाही तर प्रत्येकाच्या कर्तव्याचे आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना इतर भाषा बोलतानाही मराठीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. छाया दापके होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाचे प्रमुख प्रा. राजा जगताप यांनी केले व सप्ताहातील उपक्रमांची माहिती दिली. कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी प्रमुख प्रा. सौ. भाग्यश्री गोंदकर होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. वैशाली बोबडे यांनी मानले.
या उपक्रमाला आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तीनही फॅकल्टीतील विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रा. सुवर्णा गेंगजे आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मारुती लोंढे यांचे सहकार्यही मिळाले.