लोकदर्शन 👉मोहन भारती
गडचिरोली दिनांक 1 ऑक्टोबर 2025
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर होणाऱ्या पुरस्कारांमध्ये यंदाचा उत्कृष्ट अधिसभा (सिनेट) सदस्य पुरस्कार गुरुदास गंगुबाई मंगरुजी कामडी यांना जाहीर झाला आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी ३० सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत ही घोषणा केली. हा पुरस्कार ६ ऑक्टोबर २०२५ रोजी विद्यापीठाच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
गुरुदास कामडी यांनी २०१०-१५ दरम्यान नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून विद्यार्थ्यांचे, प्राध्यापकांचे आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे अधिसभेत मांडले. त्यानंतर त्यांनी गोंडवाना विद्यापीठातही परीक्षा व्यवस्थेत सुधारणा, क्रीडा स्पर्धा आयोजनातील बदल, विद्यापीठ प्रशासनातील पारदर्शकता अशा अनेक मुद्द्यांवर ठाम भूमिका घेतली. सध्या ते विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे व खरेदी समितीचे सदस्य असून ७ विविध अध्यासनांवर कार्यरत आहेत.
यापूर्वी त्यांना भारत शिक्षण रत्न पुरस्कार, आदर्श शिक्षक, महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार अशा मान्यवर पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता गोंडवाना विद्यापीठाने दिलेला उत्कृष्ट सिनेट सदस्य पुरस्कार हा त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आणखी एक सन्मान आहे.
या सन्मानाबद्दल कुलगुरु डॉ. प्रशांतजी बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत मोहीते, प्रा. योगेश येणारकर, प्रा. धर्मेंद्र मुनघाटे यांच्यासह अनेक सिनेट सदस्य व सहकारी शिक्षक–विद्यार्थ्यांनी गुरुदास कामडी यांचे अभिनंदन केले.