लोकदर्शन गडचिरोली 👉मोहन भारती,
गडचिरोली – गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील विविध प्रश्न, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी दरमहा नियमितपणे होणाऱ्या कॅम्पच्या पुनर्बहालीस अखेर मान्यता मिळाली आहे. यामुळे शिक्षक आणि कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजी गडचिरोली दौऱ्यादरम्यान अशा कॅम्पचे आयोजन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सहसंचालक (उच्च शिक्षण), नागपूर विभाग यांनी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी गडचिरोली येथे कॅम्प घेऊन शिक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढले होते. मात्र, काही काळापासून हे कॅम्प बंद झाले होते.
या पार्श्वभूमीवर गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, सचिव डॉ. विवेक गोर्लावर, डॉ. नरेंद्र हरणे व डॉ. उमेश इंदुरकर यांनी सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण यांना भेटून कॅम्प पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. यासोबतच, शिक्षक आमदार मा. सुधाकरराव अडबाले यांनाही संघटनेने निवेदन दिले होते.
ही मागणी सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण यांनी मान्य करत 30 जून 2025 रोजी पत्र क्रमांक 2218/2015 अन्वये कॅम्पबाबत अधिकृत पत्र निर्गमित केले. या निर्णयानंतर गोंडवाना विद्यापीठाने देखील 9 जुलै 2025 रोजी परिपत्रक क्रमांक गो.वी./आस्था/2196/2025 जाहीर करत, दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत कॅम्प आयोजित होणार असल्याची अधिकृत माहिती दिली आहे.
या निर्णयामुळे गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सर्व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनने सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण यांचे आभार मानले असून, संघटनेच्या वतीने सर्व संबंधितांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले