लोकदर्शन 👉डॉ. रिता मदनलाल शेटीया
एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, धायरी येथे वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गेस्ट लेक्चर सिरीजची सुरुवात ‘चर्चा केंद्रीय अर्थसंकल्पाची २०२६’ या विषयावरील व्याख्यानाने झाली. या कार्यक्रमात पुणे येथील प्रसिद्ध लेखिका, सहायक प्राध्यापिका आणि रिता इंडिया फाउंडेशनच्या संचालिका प्रा. डॉ. रिता मदनलाल शेटीया यांनी विद्यार्थ्यांना केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. अनिता सापटे, उपाध्यक्ष आनंद सापटे आणि सचिव अनिल सापटे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही गेस्ट लेक्चर सिरीज पाच दिवस चालणार असून विविध विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींची मार्गदर्शक व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
या गेस्ट लेक्चर सिरीजचे उद्घाटन आबेदा इनामदार महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एम. जी. मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश धारणे, उपप्राचार्य अंकुश जाधव तसेच सामाजिक कार्यकर्त्या एच. सी. सविता शेटीया उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. एम. जी. मुल्ला यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना नवीन शैक्षणिक धोरणानुसार असलेला अभ्यासक्रम आणि कौशल्याधारित शिक्षण विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. तसेच अशा गेस्ट लेक्चर्समधून विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते, त्यामुळे प्रत्येक संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रा. डॉ. रिता मदनलाल शेटीया यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ विद्यार्थ्यांना सोप्या आणि व्यावहारिक उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितला. दैनंदिन जीवनात व्यक्तिगत अर्थसंकल्पाचे महत्त्व काय असते यावरही त्यांनी प्रकाश टाकला. अर्थसंकल्प यशस्वी होण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, निधीचा पारदर्शक वापर आणि विकासाचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी या तिन्ही घटकांवर विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अर्चना शहाणे आणि योगिता राऊळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षिका श्रीमती श्रुती रेगे, वैशवी जेटके तसेच श्री. शुभम कदम, पूर्णिमा तिडके, कमल जाधव आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.





