लोकदर्शन👉मोहन भारती
गडचांदूर: गडचांदूरच्या गांधी चौकात २४ आणि २५ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित ‘श्री माता महाकाली महोत्सव २०२५’ मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा होणार आहे. श्री माता महाकाली महोत्सव आयोजन समिती आणि श्रीतेज प्रतिष्ठान, गडचांदूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय महोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
महोत्सवाचे प्रमुख आकर्षण माता महाकालीच्या चांदीच्या मूर्तीचे आगमन आणि प्रत्यक्ष दर्शन सोहळा हे असणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात २४ सप्टेंबर रोजी दुपारी १:०० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीपासून निघणाऱ्या मिरवणुकीने होईल, ज्यात माता महाकालीच्या चांदीच्या मूर्तीचे आगमन होईल. दुपारी ४:०० वाजता होणाऱ्या प्रत्यक्ष दर्शन सोहळ्यात प्रथम १११ महिलांना मूर्तीच्या चरणस्पर्शाने आशीर्वाद घेण्याची संधी मिळेल.
सायंकाळी ६:०० वाजता महाआरती झाल्यानंतर मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडेल. त्यानंतर सायंकाळी ७:०० वाजता भक्ती संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात चेतन लोखंडे, दिनेश कुमार, आकांक्षा देशमुख आणि निकिता जोशी यांसारखे प्रसिद्ध कलाकार आपली भक्तीगीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करतील.
दुसऱ्या दिवशी, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९:०० वाजता महाआरती आणि हवनाचा कार्यक्रम होईल. हवनानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाईल. या महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी श्री निलेश शं. ताजने यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
हा महोत्सव गडचांदूरमधील भाविकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल. सर्व नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन माता महाकालीचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.