लोकदर्शन पंढरपूर 👉 रंगनाथ डोके
महात्मा फुले यांची विचारधारा ही केवळ ग्रंथांत नसून कृतीत उतरली पाहिजे, या जाणिवेने प्रेरित होऊन फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशनल अॅण्ड सोशल फाउंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रा तर्फे पंढरपूर तालुक्यातील भैरवनाथ वाडी येथे उद्या, रविवार दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता एक आगळा-वेगळा वास्तूपूजन सोहळा होणार आहे.
या सोहळ्यात श्रीमती द्वारकाबाई कुंडलिक देवकते यांच्या ‘द्वारका निवास’ बंगल्याचा गृहप्रवेश पारंपरिक कर्मकांडापासून दूर राहून महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक तत्त्वांनुसार केला जाणार आहे.
या सोहळ्याचे विधीकार्य सत्यशोधक रघुनाथ ढोक — जे संस्थेचे अध्यक्ष असून महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले साहित्य साधना व प्रकाशन समितीचे सदस्य आहेत — त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
द्वारकाबाई देवकते यांचा ठाम विश्वास —
“आजही समाजात कर्मकांड, मुहूर्त, अंधश्रद्धा याला खतपाणी घालणारे अनेकजण आहेत. त्यामुळे बहुजन समाज आर्थिक व वैचारिकदृष्ट्या मागे पडत आहे. ही साखळी तोडण्यासाठी महापुरुषांचे विचार कृतीत उतरवणं हाच पर्याय आहे. म्हणून मी कोण काय म्हणेल हे न पाहता, कोणताही मुहूर्त न बघता फक्त सुट्टीचा दिवस निवडून हा सोहळा ठेवला.”
संस्थेचे सामाजिक कार्य देखील व्यापक
सत्यशोधक ढोक यांनी सांगितले की, “हा पंढरपूर परिसरातील १५ वा सत्यशोधक वास्तू सोहळा असून गेल्या पाच वर्षांपासून हे कार्य सातत्याने सुरु आहे. येत्या ६ ऑगस्टला पुणे येथे अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्ताने ५४ वा आंतरजातीय विवाह सोहळा आयोजित केला आहे, जो लक्ष्मण पांचाळ (हैदराबाद) आणि तेजश्री शेंडगे (बार्शी) यांचा विवाह असून पूर्णपणे मोफत आहे.”
समारोप:
या वास्तूपूजन सोहळ्याच्या निमित्ताने अंधश्रद्धा, कर्मकांड आणि जातभेदाविरुद्ध एक सकारात्मक पाऊल उचलण्यात येत आहे. सत्यशोधक विचार कृतीत आणण्याचा हा खरा मार्ग आहे, हेच या उपक्रमातून पुन्हा सिद्ध होत आहे.