आनंदवनच्या पुढाकाराने प्रशासन सुखावले

BY : Rajendra Mardane, Warora
* कोरोनाग्रस्तांना आवश्यक सामुग्रींचा पुरवठा
वरोरा : महारोगी सेवा समितीने आनंदवनात पसरलेल्या कोरोना लाटेला थोपवून त्यावर नियंत्रण मिळवत आता ‘ मिशन आनंद सहयोग ‘ या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी विविध अत्यावश्यक सामुग्रींचा पुरवठा करण्याची दानत दाखवून समाजासमोर पुन्हा एकदा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या अशा अनपेक्षित सहकार्याने प्रशासन सुखावले आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि प्रचंड वेगाने वाढत्या मृत्यूदराच्या पार्श्वभूमीवर महारोगी सेवा समिती, आनंदवन या संस्थेने समोर येत वरोरा उपजिल्हा रुग्णालयात ५ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेट मशीन, ५ मोठे (जेम्बो )ऑक्सीजन सिलेंडर अणि औषधाचा पुरवठा केला. यापुढे ही रुग्णांन आवश्यकतेनुसार औषधे देण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे.
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी कार्यरत शांतीवन प्रकल्प, बीड येथे कोव्हीड सेंटर उभारण्यात येत असून त्यासाठी आनंदवनातून १०० खाटा, १०० गाद्या – चादरी व कापडी मास्क पाठविण्यात आल्या आहेत.
वरोरा तालुक्यातील दिव्यांग, निराधार व भूमिहीन कुटुंबाकरीता ३०० रेशन कीट देण्यात येणार असून एकूण १ हजार रेशनकीट वितरीत करण्याचा संकल्प आनंदवनने केला आहे.
जिवती तालुक्यातील दुर्गम भागातील २०० आदिवासी, दिव्यांग आणि गरजू कुटुंबांसाठी महिनेभराची रेशनकीट वरोरा तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
आनंदवनातील सीतारमण रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे. विलिनीकरसाठी आनंदवनातील शाळा, वसतिगृहात सुविधा उपलब्ध करण्यात आली असून डॉ. विजय पोळ यांच्या देखरेखीखाली योग्य नियोजन, नियंत्रणामुळे अल्पावधीतच कोरोना रूग्ण मोठ्या प्रमाणावर बरे झालेत. आनंदवनात कोरोना संसर्ग वाढून तो आटोक्यात आल्यानंतर ईतर कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी आनंदवन सरसावले आहे.
महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या सूचनेनुसार कौस्तुभ आमटे, पल्लवी आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात म.से.स. अंतर्गत सीतारमण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पोळ, सीतारमण रुग्णालयाची संपूर्ण टीम अहोरात्र मेहनत घेत आहे. सोबतच अतुल मंडवगणे, राजेश ताजने, शौकत खान, रवींद्र नलगिंटवार, साबिया खान, कपिल कदम यांचे सह आनंदवनातील युवा कार्यकर्ते यांचे बहुमूल्य सहकार्य लाभत आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *