विठोबा बोंडे आमरण उपोषणावर – सहाव्या दिवशी प्रकृती खालावली, प्रशासनावर ढोंगीपणाचा आरोप!

लोकदर्शन👉 मोहन भारती

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील सांगोडा येथील शेतकरी विठोबा दिनकर बोंडे यांनी ग्रामपंचायतीच्या गायरान जमिनीचे दालमिया सिमेंट कंपनीला वाटप करण्याच्या निर्णयाविरोधात २३ सप्टेंबरपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा सहावा दिवस असून, त्यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.

ग्रामस्थांच्या मते, सांगोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच व सचिव यांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता मासिक सभेत गावाच्या हक्काची २० हेक्टर मौल्यवान जमीन कंपनीला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याचा ठराव मंजूर केला. या निर्णयाविरोधात ग्रामस्थ संतप्त असून, त्यांनी याला सरपंचाचा भ्रष्टाचार व ग्रामहिताचा विश्वासघात ठरवत तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

दरम्यान, गटविकास अधिकाऱ्यांनी २ ऑक्टोबर रोजी ग्रामसभेत हा मुद्दा घ्यावा असा आदेश दिला होता, परंतु सरपंच व सचिवांनी तो धुडकावून लावल्यामुळे वाद अधिक चिघळला आहे.

काँग्रेसचा इशारा – “प्रशासन झोपेत, आम्ही रस्त्यावर उतरणार!”

या आंदोलनाला माजी आमदार व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुभाष धोटे यांनी भेट देऊन आंदोलकांची बाजू ऐकून घेतली. त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. मात्र प्रशासनाने जबाबदारी झटकली, तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले.

ग्रामस्थांचा आरोप आहे की, सरपंचाने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे प्रशासनावर दबाव आणून त्याला संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे गायरान जमीन उद्योगाला देण्याचा व्यवहार ‘सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्ताने’ पार पडल्याचा संशय तीव्र झाला आहे.

मुसळधार पावसातही उपोषण कायम

ग्रामस्थांनी वारंवार निवेदनं दिली, पण ती धुळखात पडल्यामुळेच उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे सांगितले. मुसळधार पावसातही बोंडे यांचे उपोषण सुरू असून, त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत आहे.

गावकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :

गुपचूप दिलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ तात्काळ रद्द करावे.

ग्रामपंचायतीतील आर्थिक अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा.
जीवाला धोका, जबाबदारी प्रशासनावरच!

प्रशासन ठोस निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप उफाळला आहे. “उपोषणकर्ते विठोबा बोंडे यांच्या जीवाला काही अनर्थ झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावरच राहील”, असा थेट इशारा काँग्रेस कमिटीने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here