सांगोडा प्रकरणावर काँग्रेस आक्रमक; उपोषणकर्ते विठोबा बोंडे यांच्या प्रकृतीची सुभाष धोटेंची चौकशी ♦️मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास सोमवारपासून कोरपना येथे चक्काजामचा इशारा

लोकदर्शन 👉मोहन भारती

कोरपना :–दिनांक 27सप्टेंबर
कोरपना तालुक्यातील मौजा सांगोडा येथे ग्रामपंचायतीच्या २० हेक्टर गायरान जमिनीचा बेकायदेशीर ताबा दालमिया सिमेंट कंपनीला देण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सरपंचाने ग्रामसभा न घेता केवळ मासिक सभेत ठराव करून कंपनीशी संगनमत केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या भ्रष्टाचारविरोधात व इतर आठ न्याय्य मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विठोबा दिनकर बोंडे यांनी दि. २३ सप्टेंबरपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

अनेक दिवस उलटूनही प्रशासनाने ठोस भूमिका न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी आज उपोषणस्थळी भेट देऊन श्री. बोंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी गावकऱ्यांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून घेतल्या आणि तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच संबंधित विभागांशी चर्चा करून मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली.

धोटे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही संपर्क साधून या प्रकरणी विलंब न करता कारवाई करावी, असे स्पष्ट केले. अन्यथा येत्या सोमवारपासून कोरपना येथे काँग्रेसच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, माजी सभापती श्यामभाऊ रणदिवे, माजी उपसभापती संभाजी कोवे, तसेच शैलेश लोखंडे, नितीन बावणे, भाऊजी चव्हाण, मुरलीधर बल्की, कल्पतरू कन्नाके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here