लोकदर्शन मुंबई प्रतिनिधी: महेश कदम
दादर :दिनांक 23सप्टेंबर
दादर येथील अतिक्रमित मासळी बाजार गेल्या पंचवीस वर्षांपासून रस्त्यावर असल्यामुळे स्थानिक रहिवासी मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत. वाहतूक कोंडी, पादचारी व शाळेतील लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांना या बाजारामुळे अपघात व आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. रस्त्यावर चालणारे बेकायदेशीर मासळी धंदे, थर्माकोल, भुसा, डबल पार्किंग, मासे सांडपाणी आणि गर्दीमुळे स्थानिक रहिवासी सतत त्रस्त आहेत.
या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत जी/नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. विनायक विसपुते, झोन–२ चे उपआयुक्त श्री. प्रशांत सपकाळे, दक्षिण मध्य मतदारसंघाचे खासदार श्री. अनिल देसाई, बाजार विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. मनीष वालांजु आणि माहिमचे आमदार श्री. महेश सावंत यांच्या उपस्थितीत स्वराज्य सोसायटीसह २०० हून अधिक रहिवाशांनी मासळी बाजार हलविण्यास विरोध दर्शविला.
बैठकीदरम्यान, बाजार विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना मासळी बाजार तात्पुरत्या ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आणि कायमस्वरूपी स्थलांतरासाठी महात्मा ज्योतिबा फुले बाजार निश्चित करण्याचे सांगितले गेले. मात्र, रहिवाशांनी मागितलेली कालमर्यादा अधिकाऱ्यांकडून दिली गेली नाही.
यामुळे स्थानिक रहिवाशांनी ठरवले आहे की, २८ सप्टेंबर २०२५ पर्यंत हा प्रश्न निकाली न निघाल्यास, ते सेनापती बापट मार्गावरील रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करतील. तसेच, या विलंबामुळे उद्भवणाऱ्या परिणामांची जबाबदारी मुंबई महापालिकेवर (MCGM) असेल, असे आवाहन त्यांनी केले आहे.