लोकदर्शन 👉मोहन भारती
चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातील कंत्राटी संगणक चालकांचा सहा महिन्यांपासून रखडलेला मानधनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी तब्बल १५.३५ कोटी रुपये निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
कंत्राटी संगणक चालकांनी या निर्णयामुळे सुटकेचा नि:श्वास टाकत आमदार श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.
कृषी व संलग्न विभागातील कंत्राटी कर्मचारी वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. परंतु, त्यांना नोकरीत सुरक्षितता नाही. मानधन कमी असून ते वेळेवर न मिळाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत होता. अनेक वेळा पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही अनुदान न आल्याचे कारण देत त्यांना मानधनापासून वंचित ठेवले जात होते.
या सर्व समस्यांकडे लक्ष वेधत आमदार मुनगंटीवार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळत शासन निर्णय जारी झाला आहे. त्यामुळे कंत्राटी संगणक चालकांचा मानधन प्रश्न सुटला आहे.
कर्मचाऱ्यांनी मानले आभार
जिवती येथे पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी योजनेअंतर्गत कार्यरत असलेले कंत्राटी संगणक चालक के. एम. कोटनाके यांनी सांगितले की, “गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मानधन मिळण्यात अडचणी येत होत्या. आम्ही आमदार मुनगंटीवार यांना समस्या सांगितली. त्यांनी तातडीने या विषयाचा पाठपुरावा करून आमची मोठी अडचण सोडवली.”