जन्मभूमी व कर्मभूमीत शिक्षकांचा सन्मान : पिंपळगावात आदर्श शिक्षकांचा सत्कार

लोकदर्शन –👉मोहन भारती

तालुक्यातील पिंपळगाव येथे मित्र परिवाराच्या वतीने आदर्श शिक्षक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात गावातील दोन शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याने गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

सत्कारमूर्तींमध्ये मंगेश बोढाले यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात त्यांनी राबविलेल्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागवला असून, त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे पिंपळगाव हीच त्यांची जन्मभूमी आहे.

याच सोहळ्यात अशोक गोरे यांचाही सत्कार करण्यात आला. आपल्या दीर्घ सेवेत त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले असून निवृत्तीनंतरही ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. पिंपळगाव ही त्यांची कर्मभूमी आहे, म्हणून गावकऱ्यांनी त्यांचा सन्मान केला.

या कार्यक्रमात गावातील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी शिक्षकांचे योगदान अधोरेखित करताना – “शिक्षक हे समाजाचे दीपस्तंभ आहेत” असे प्रतिपादन केले. यावेळी बोढाले व गोरे यांनीही आपल्या भावना व्यक्त करून गावकऱ्यांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हभप खुशाल गोहोकर यांनी केले, संचालन रमेश लोणबले यांनी तर आभार प्रदर्शन बंडू बोढाले यांनी केले.

या सत्कार सोहळ्यामुळे गावात सांस्कृतिक आणि शैक्षणिक वातावरणाचा उत्साह निर्माण झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here