ग्रामीण मुलींसाठी आरोग्य जनजागृती उपक्रम; शिशुविहार विद्यामंदिर, बदलापूर येथे सॅनिटरी पॅडचे वितरण!

लोकदर्शन बदलापूर (प्रतिनिधी👉 – गुरुनाथ तिरपणकर)

ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्य, स्वच्छता आणि मासिक पाळीविषयी जागरूकता वाढवण्यासाठी जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने बदलापूर गावातील शिशुविहार विद्यामंदिर येथे सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्यात आले.

या उपक्रमात कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या आशा स्वयंसेविका संजीवनी पाटील यांनी उपस्थित मुलींना मासिक पाळी, शारीरिक बदल, स्वच्छता आणि सॅनिटरी पॅडचा योग्य वापर व विल्हेवाट याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी मुलींना या विषयातील गैरसमज दूर करण्यासाठी संवाद साधला आणि आरोग्यविषयक मूलभूत माहिती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिशुविहार विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा विद्याताई साठे होत्या. त्यांनी मुलींना शिक्षणाबरोबरच आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश दिला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी कमांडिंग ऑफिसर, राष्ट्रपती पदक सन्मानित दिलीप नारकर आणि जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे ‘मायदेशीच्या लोककथा’ हे पुस्तक व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका अलका तारु, शिक्षिका प्रतिभा गडकरी, रेश्मा कांबळे, वैशाली दोडके आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले. ग्रामीण भागातील मुलींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आशा स्वयंसेविका संजीवनी पाटील यांचे विशेष योगदान लाभले. जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांना आभारपत्र, शाल व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here