नागपुरात आगळावेगळा ‘सत्यशोधक’ विवाह: फुले विचारांवर आधारित वैचारिक संगम

लोकदर्शन नागपूर 👉रघुनाथ ढोक

नागपूर: समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि शिक्षणक्रांतीच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत नागपूर शहरात एक आगळावेगळा सत्यशोधक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महात्मा फुले यांच्या १९९ व्या जयंतीचे औचित्य साधून सत्यशोधिका प्रतीक्षा सुरेश पोहनकर आणि सत्यशोधक विकास दत्तात्रय बोराटे हे ‘प्रेम, सामंजस्य, विवेक आणि समता’ या तत्त्वांवर आधारित आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करणार आहेत.

वैचारिक कार्यक्रम ठरणार मुख्य आकर्षण
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ विवाह सोहळा नसून सामाजिक जागृतीचा संदेश देणारा उपक्रम आहे. विवाहापूर्वी सायंकाळी ५ वाजता चंद्रपूर येथील प्रसिद्ध सादरकर्त्या सौ. गायत्री रामटेके यांचा ‘मी सावित्रीमाई फुले बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग सादर केला जाणार असून तो उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे।

कधी आणि कुठे होणार आयोजन
हा विवाह सोहळा सोमवार, ६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता श्री सिद्धेश्वर सभागृह, तुकडोजी पुतळा जवळ, नागपूर येथे पार पडणार आहे. या विवाहाचे विधीकर्ते आणि आयोजक महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले चरित्र साधने व प्रकाशन समितीचे सदस्य तसेच प्रसिद्ध सत्यशोधक रघुनाथ ढोक हे असणार आहेत.

समता आणि विवेकाचा संदेश
पोहनकर आणि बोराटे परिवाराने या विवाहाच्या माध्यमातून विवाह हा केवळ सामाजिक व कायदेशीर बंधन नसून समानता आणि समजुतीवर आधारित सहजीवनाची सुरुवात आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या पुरोगामी उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे।

नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
समस्त पोहनकर-बोराटे परिवाराकडून नागरिकांना या अनोख्या विवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदांपत्यास शुभाशीर्वाद देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here