सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा! महापौर रितू तावडे यांच्यासमवेत सकारात्मक बैठक; नोकरी व पेन्शन प्रश्नांवर लवकर निर्णयाचे आश्वासन

लोकदर्शन मुंबई 👉 – गुरुनाथ तिरपणकर

पर्जन्य जलनिस्सारण (SWD) खात्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या एका पाल्याला मुंबई महापालिकेत नोकरी देण्याच्या मागणीवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

महापौरांनी स्पष्ट केले की, लाड-पागे समिती ही महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येत असली तरी या विषयावर महापालिका स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आयुक्तांना पत्र पाठवण्यात येईल. तसेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संबंधित अधिकारी व कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन पुढील धोरण निश्चित केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

याचबरोबर सातव्या वेतन आयोगानुसार पे-फिक्सेशनमध्ये झालेल्या त्रुटींमुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कमी प्रमाणात ग्रॅच्युइटी व पेन्शन मिळत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या संदर्भात संबंधित विभागीय अधिकारी व पेन्शन विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.

एकूणच, ही बैठक सकारात्मक आणि मुद्देसूद वातावरणात पार पडली असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरच ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या बैठकीला मोठ्या संख्येने सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here