लोकदर्शन वालूर/प्रतिनिधी –👉महादेव गिरी
शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील खाजगी आस्थापनेच्या शाळांमधील शिक्षकांना बीएलओ (बुथ लेव्हल ऑफिसर) तसेच मास्टर ट्रेनरच्या कामातून तात्काळ मुक्त करण्यात यावे, अशी ठाम मागणी सेलू शहरातील मुख्याध्यापकांनी तहसीलदार, तहसील कार्यालय सेलू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक राष्ट्रीय कार्य म्हणून बीएलओ व इतर निवडणूकविषयक जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. या कामास कधीही विरोध करण्यात आलेला नाही. मात्र सध्या शिक्षकांवर ऑनलाइन स्वरूपातील विविध शासकीय कामांचा मोठा ताण आहे. यामध्ये निपुण चाचण्या, आधार अपडेट, अपार आयडी, यु-डायस, आय गॉट कर्मयोगी, स्टुडन्ट पोर्टल, स्विफ्ट चार्ट उपस्थिती, विद्यार्थी सुरक्षा आदी कामांचा समावेश आहे.
बीएलओ कामामुळे वर्ग अध्यापनात सातत्य राहात नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी वाढत असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थी संख्येवर होत आहे. परिणामी शिक्षक संख्येच्या संचमान्यतेवरही परिणाम होण्याची भीती मुख्याध्यापकांनी व्यक्त केली आहे. अनेक शाळांमध्ये कर्मचारी संख्या अपुरी असून काही कर्मचारी रजेवर असल्याने उर्वरित शिक्षकांवर अतिरिक्त ताण येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचेही निवेदनात नमूद आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तात्काळ माहिती मागवली जात असताना शिक्षक वर्गात उपलब्ध नसल्यामुळे ती वेळेत देणे कठीण जात आहे. दुसरीकडे बीएलओ म्हणून नियुक्त कर्मचाऱ्यांना वेळेचे ठोस बंधन नसून सलग निवडणुका सुरूच असल्याने शिक्षक कायम या कामात अडकून पडत आहेत. काही कर्मचारी वर्षानुवर्षे याच कामासाठी नियुक्त असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.
या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करावे, अशी विनंती मुख्याध्यापकांनी केली आहे. या निवेदनावर मुख्याध्यापक धनंजय भागवत, मोगल आर.एस., कपाटे पी.टी., थटवले आर.एल., शिंदे डी.डी., गोरे आर.जी., पाठक आर.बी., धारा सूरकर एस.एस., साळवे जी.आर., पांडे यू.जी. आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.





