लोकदर्शन 👉अशोककुमार भगत
गडचांदूर : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कोरपणा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन महिन्यांच्या वर्षावास कालावधीचा समारोप समता, श्रद्धा आणि बंधुभावाच्या वातावरणात सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी उत्साहात पार पडला.
दि. 10 जुलै 2025 (आषाढी पौर्णिमा) पासून ते दि. 7 ऑक्टोबर 2025 (आश्विन पौर्णिमा) या कालावधीत पार पडलेल्या या वर्षावास काळात बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान, आचारसंहिता आणि मानवतेचा संदेश यांचा प्रसार साधला गेला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनातून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत समता सैनिक दलाच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत बौद्ध उपासक-उपासिका, समता सैनिक दलाचे सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
या समारोपीय सोहळ्याचे अध्यक्षस्थान बौद्धाचार्य आणि भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष आयु. श्रावण बुधाजी जिवणे यांनी भूषविले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य संघटक व केंद्रीय शिक्षिका आयुनि. कैविशताई मेश्राम, जिल्हा अध्यक्ष आयु. किशोरभाऊ तेलतुंबडे, कोषाध्यक्ष व समता सैनिक दलाचे लेफ्टनंट कर्नल आयु. गुरूबालक मेश्राम, सचिव आयु. शेषराव सहारे, संघटक आयु. कृष्णदास गजभीये, ॲड. आयु. संजय निरंजने, प्राचार्य डॉ. सोमाजी गोंडाणे, प्रा. आयुनि. माधुरीताई ऊके, कविकर आयु. निरंजने, कोषाध्यक्ष व बौद्धाचार्य आयु. उत्तम परेकर, सरचिटणीस आयु. गिरीष पाझारे, तसेच संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष आयु. बादल चांदेकर यांनी उपस्थितांना बौद्ध धर्मातील समतेचा आणि मानवी मूल्यांचा अर्थ स्पष्ट करणारे विचारमंथन केले.
प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभा गडचांदूर शहर शाखेचे अध्यक्ष आयु. पद्माकरजी खैरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर शाखेचे सरचिटणीस आयु. राहुल निरंजने यांनी तर आभार प्रदर्शन समता सैनिक दलाच्या सैनिक आयुनि. सिमाताई खैरे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात समता सैनिक दलाच्या सैनिक आयुनि. आशाताई सोनडवले यांच्यासह सर्व उपासक-उपासिका, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समर्पणभावाने परिश्रम घेतले.
वर्षावासाच्या या समारोपीय सोहळ्याने गडचांदूरच्या सामाजिक-सांस्कृतिक वातावरणात समतेचा, करुणेचा आणि जागृतीचा नवा झंकार उमटविला.