गडचांदूरसारख्या औद्योगिक शहराला तरीही पोस्ट ऑफिसची स्वतंत्र इमारत नाही! ♦️भाड्याच्या खोलीत चालणारे पोस्ट ऑफिस, सुरक्षिततेचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची कमतरता – नागरिक त्रस्त

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर

गडचांदूर (ता. कोरपना, जि. चंद्रपूर) :
सिमेंट उद्योग, खाणकाम आणि बँकिंग सुविधांनी विकसित झालेले गडचांदूर हे शहर आज कोरपना व जिवती तालुक्यांच्या मध्यभागी औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जाते. येथे राष्ट्रीयकृत बँका, स्वतंत्र पोलिस स्टेशन, मोठे उद्योग असताना मात्र पोस्ट ऑफिसची अवस्था दयनीय आहे. छोट्याशा भाड्याच्या खोलीत चालणारे पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी मोठा त्रासदायक ठरत असून स्वतंत्र इमारतीची मागणी तीव्र झाली आहे.

गडचांदूर येथे अल्ट्राटेक माणिकगढ, आवारपूर, अंबुजा, एसीसी मराठा व दालमिया अशा चार प्रमुख सिमेंट कारखान्यांबरोबरच पैंनगंगा ओपन कास्ट खाण असल्याने हजारो कामगार व नागरिकांचे व्यवहार येथे होतात. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी, बँक ऑफ इंडिया अशा बँकांच्या शाखा असूनही पोस्ट ऑफिस मात्र असुरक्षित आणि अपुरे आहे.

सदर पोस्ट ऑफिसमध्ये तिजोरीची सुविधा नसल्याने दररोज रोख रक्कम पोलिस स्टेशनमध्ये ठेवावी लागते. फक्त तीन कर्मचारी असल्यामुळे ग्राहकांना तासनतास रांगेत थांबावे लागते. शिवाय बहुतेक कर्मचारी परप्रांतीय असल्याने भाषेच्या अडचणी निर्माण होतात.

“शहरात उद्योगांची रेलचेल आहे; पण पोस्ट ऑफिसची अवस्था पाहून वाईट वाटते. स्वतंत्र इमारत व अधिक कर्मचारी उपलब्ध करून दिले जावेत,” अशी मागणी नागरिकांनी केली आहे. स्थानिक संघटना व काँग्रेस कार्यकर्त्यांनी वेळोवेळी या प्रश्नावर आवाज उठविला, तरीही कारवाई झालेली नाही.

औद्योगिकदृष्ट्या प्रगत गडचांदूरमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव राहणे ही मोठी विसंगती आहे. त्यामुळे खासदार महोदयांनी तातडीने लक्ष घालून स्वतंत्र पोस्ट ऑफिसची इमारत उभारावी, अशी शहरवासीयांची ठाम मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here