लोकदर्शन👉 रघुनाथ ढोक
पुणे : पावसाची पर्वा न करता जेधे मेन्शनपासून उमाजी नाईक स्मारक, बाबुराव जगताप स्मारक मार्गे सत्यशोधक हेरिटेज वॉक काढण्यात आला. रघुनाथ ढोक व राखी रासकर यांनी अनुक्रमे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत हजेरी लावली. महापुरुषांच्या प्रतिमांना वंदन करून व समाजाचा जयघोष करत परिसर दुमदुमला.
छत्रपती शाहू महाराज नगरीत सत्यशोधक समाजाच्या झेंड्याचे ध्वजारोहण माजी सनदी अधिकारी महेश झगडे व माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर श्रीमंत खासे पवार सभागृहात शिवरायांची राजमुद्रा, सार्वजनिक सत्यधर्म व संविधान प्रतिमेचे अनावरण करून उद्घाटन सत्राला प्रारंभ झाला.
🔹 डॉ. बाबा आढावांचा गौरव
या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना महात्मा फुलेंचा शेला, पागोटं व रु. ३०,००० चा धनादेश देऊन “सत्यशोधक शिक्षक पुरस्कार” प्रदान करण्यात आला. त्यांनी सत्यशोधक विचारांचे संस्कार, शिवाजी मराठा सोसायटीशी असलेले आपले संबंध व वर्तमान काळात सत्यशोधक तत्त्वज्ञानाचे महत्त्व सांगितले.
🔹 मान्यवरांची मांडणी
महेश झगडे यांनी प्राचीन ते वर्तमान इतिहास उलगडून शेतकरी-कष्टकरी वर्गाच्या शोषणाविरुद्ध भूमिका घेतली.
कमल व्यवहारे (माजी महापौर) यांनी बाबासाहेबांच्या संविधानामुळे महिलांना राजकारणात संधी मिळाल्याचा अनुभव सांगितला.
राजकुमार धुरगुडे (अध्यक्ष) यांनी इतिहासाचे विकृतीकरण व जातीभेदाच्या भिंतींचा पर्दाफाश करून जनजागृतीचा निर्धार व्यक्त केला.
कॉ. किशोर ढमाले यांनी फुले-आंबेडकरी विचारांची परंपरा सांगत “भारत छोडो आंदोलनात सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते अग्रणी होते” हे अधोरेखित केले.
अरविंद खैरनार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाक्त राज्याभिषेकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी मांडून सत्यशोधक समाजासाठी मातृसत्ताक मूल्यांचे महत्त्व पटवून दिले.
प्रवीण गायकवाड (प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड) यांनी संविधान समजावून सांगणे, प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन व सत्यशोधक विचार प्रसारित करण्याची गरज अधोरेखित केली.
🔹 जनसहभाग
चक्रीवादळाच्या पावसाची तमा न बाळगता सत्यशोधकांची मोठी उपस्थिती या परिषदेला लाभली. यशस्वी आयोजनासाठी जगदीश जेधे, प्रा. दत्ताजीराव जाधव, अमृतराव काळोखे, मुकुंद काकडे आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.