लोकदर्शन.👉अशोककुमार भगत
गडचांदूर :दिनांक 1 आक्टोम्बर
गडचांदूरच्या मातृशक्तीने आज सकाळी ६ वाजता समता, न्याय आणि बौद्ध धम्माच्या घोषणा देत नागपूरच्या पवित्र दिक्षाभूमीकडे कूच केलं. समता सैनिक दलाच्या सुमारे ५० महिला सैनिकांनी खाकी वर्दीत सज्ज होऊन बाबासाहेबांच्या विचारधारेचं रक्षण करण्याचा निर्धार करत ही यात्रा सुरू केली.
ही फक्त एक यात्रा नाही, तर बाबासाहेबांच्या विचारांच्या जयघोषाने भारलेलं पथसंचालन आहे. भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या केंद्रीय नेतृत्वाखाली आयोजित या मार्चमध्ये गडचांदूर आणि कोरपना तालुक्यातील विविध गावांतील तरुणी व महिलांचा सहभाग आहे. दलाच्या हातात बाबासाहेबांची प्रतिमा, धम्मचक्र ध्वज आणि क्रांतिकारी घोषवाक्यांची ताकद आहे.
नागपूर दिक्षाभूमीवर पोहोचल्यावर या महिला सैनिक बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळास प्रदक्षिणा घालून पुष्पांजली अर्पण करणार आहेत. स्तूपाभोवती होणाऱ्या या प्रदक्षिणेत बौद्ध धम्माची निष्ठा, समतेची शपथ आणि सामाजिक न्यायाची मशाल प्रज्वलित होणार आहे.
या मोहिमेत आशा सोंडवले, सीमा खैरे, शिला निरंजणे, बेबी वाघमारे यांच्यासह पन्नास महिला सहभागी असून, “समतेसाठी, न्यायासाठी – बाबासाहेबांच्या मार्गावर विजय आमचाच!” या घोषणांनी गडचांदूरचा आवाज थेट नागपूर दिक्षाभूमीवर घुमणार आहे, असे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रावण जीवणे यांनी सांगितले.