लोकदर्शन.👉मोहन भारती
गडचांदूर :दिनांक 27सप्टेंबर
धानोरा–गडचांदूर–राजुरा–तेलंगणा राज्य मार्गावरील नदीवरील जुन्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पाणी पुलावरून वाहते आणि त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. परिणामी शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका, प्रवासी तसेच खाणीतून मालवाहतूक करणारी मोठी वाहनं अडकून राहतात. स्थानिक नागरिकांना यामुळे प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते इबादुल सिद्दीकी यांनी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दरवर्षी पावसाळ्यात या पुलावर पाणी साचल्यामुळे मार्ग बंद होतो. हा मार्ग राजुरा–गडचांदूर–चंद्रपूर–नागपूरसह मुंबईपर्यंतच्या प्रवासासाठी महत्वाचा असून, दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. पुल वाहतुकीस अडथळा ठरल्याने शेतकरी, व्यापारी, कामगार यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. अंबुजा कंपनी व परिसरातील खाणींमधून मालवाहतूक करणारे ट्रकसुद्धा खोळंबून राहतात.
इबादुल सिद्दीकी यांनी जुन्या पुलाच्या जागी नवीन व उंच पुलाचे तातडीने बांधकाम करण्याची मागणी केली आहे. अन्यथा येत्या काळात वाहतूक सुरळीत होण्याऐवजी ही समस्या अधिक गंभीर होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “हा पूल अनेक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत आहे. पावसाळ्यात तर गावं, बाजारपेठ आणि शहरांचा संपर्क तुटतो. शासनाने त्वरित नवा पूल उभारावा, हीच जनतेची अपेक्षा आहे.