लोकदर्शन चंद्रपूर 👉 मोहन भारती
चंद्रपूर, दि. 23 :सप्टेंबर
देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा अभियान’ अंतर्गत मुल येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून मातृशक्तीच्या आरोग्य संवर्धनाचा नवा संदेश समाजात पोहोचेल, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री व आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
उपजिल्हा रुग्णालय, मुल येथे झालेल्या या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात संध्याताई गुरनुले, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. मुनगंटीवार यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील अनेक उपजिल्हा रुग्णालये रखडलेली असताना मुल येथील रुग्णालय हा पहिला प्रयोग असून तब्बल 15 हजार चौ.मी. मध्ये अत्याधुनिक रुग्णालय उभारले जात आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या किडनीच्या रुग्णांसाठी लवकरच 5 बेडचे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात येणार आहे.”
ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात मेडिकल कॉलेज, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र, मुलींसाठी एसएनडीटी उपकेंद्र, कृषी महाविद्यालय आदी विकासकामे झाली आहेत. कोविड काळातही जनतेसाठी PPE किट्स, सॅनिटायझर मशीन व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले. महिलांच्या आरोग्यासाठी ‘पिंक ओपीडी’ सुरू करण्याचाही मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात साधारण 3 ते 4 हजार महिलांची तपासणी करण्यात येणार असून मोफत निदान, उपचार, पोषण आहार मार्गदर्शन आणि विविध शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या अभियानाचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.