सांगोडा ग्रामपंचायत व दालमिया सिमेंट कंपनीविरोधात आमरण उपोषण सुरू ग्रामस्थांचा विश्वासघात, जमीन व गायरान देण्यात आलेल्या भ्रष्टाचाराचा आरोप

लोकदर्शन 👉उमेश राजुरकर

बाखर्डी/कोरपना :दिनांक 24सप्टेंबर
सांगोडा येथील शेतकरी विठोबा दिनकर बोंडे यांनी दालमिया सिमेंट कंपनी व ग्रामपंचायत सांगोडा यांच्या विरोधात 23 सप्टेंबर 2025 पासून तहसील कार्यालय कोरपना समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी संबंधित प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे अखेर हा टोकाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रमुख मागण्या

गावकऱ्यांना विश्वासात न घेता दिलेले नाहरकत प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावे.

ग्रामपंचायतमध्ये झालेल्या आर्थिक भ्रष्टाचाराची चौकशी करून वसुली करावी.

पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दादाराव पवार यांच्यावर खोटा अहवाल दिल्याबद्दल कारवाई करावी.

गायरान जमिनी बेकायदेशीररित्या कंपनीकडे दिल्या असल्याचा तपास व्हावा.

ज्यांच्या जमिनी कंपनीने खदानीसाठी घेतल्या, त्यांना योग्य मोबदला व कायमस्वरूपी नोकरी द्यावी.

कंपनीने स्थानिक शिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.

खदान क्षेत्रातील गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून पाइपलाइन स्थलांतरित करून पुन्हा सुरू करावी.

“शासन व प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्याने शेतकरी, युवक व सामान्य नागरिकांवर अन्याय होतो आहे. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील,” असे विठोबा बोडे यांनी स्पष्ट केले.

आंदोलनाला वाढता पाठिंबा

या आमरण उपोषणाला राजकीय, सामाजिक व स्थानिक पातळीवरून मोठा पाठिंबा मिळत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे, काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष उत्तमराव पेचे, माजी सभापती शामजी रणदिवे, माजी उपसभापती संभा कोवे, सुरेश मालेकर, नितीन बावणे, माजी अध्यक्ष उमेश राजुरकर, शैलेश लोखंडे, इस्माईल शेख, वामन मुसळे, संजय ढवस, विकास भोयर, दिगंबर धोटे, महादेव हनुमंते, माणिक देवाळकर, विजय कोल्हे, संतोष पाचभाई, विकास अवताडे, चरण देवाळकर, शुभम ढवस, सौरव आगलावे, आकाश रागीट, वैभव भोयर, योगेश अवताडे, शैलेश रागीट, शुभम देवाळकर, जयभारत धोटे, बबन भोयर, अरुण भोयर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सांगोडा परिसरातील महिला, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपोषणस्थळी उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवत आहेत. स्थानिक प्रशासनाने तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here