लोकदर्शन पुणे 👉रघुनाथ ढोक
पुणे:दिनांक 23 सप्टेंबर
समता भूमीवर महात्मा फुले वाडा येथे रविवार, दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी शाक्त शिवराज्याभिषेक, सत्यशोधक समाज स्थापना दिन व संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सोहळा-२०२५ निमंत्रण पत्रिकेचे प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.
सोहळा श्री. जगदीश जेधे (श्री. शिवाजी मराठा संस्थेचे खजिनदार) आणि रघुनाथ ढोक (फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फाउंडेशन अध्यक्ष) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास राखी रासकर आणि सौ. सुनिता बोराटे यांनी अर्पण केले.
सदर सोहळ्याचे प्रास्ताविक व कार्यक्रम रूपरेषा अरविंद खैरनार यांनी मांडली. महात्मा फुले अखंडाचे गायन राखी रासकर यांनी केले, तर अड. नीरज धुमाळ यांनी तीन कार्यक्रम एकत्र घेण्यामागील मौलिक विचार स्पष्ट केले.
सोहळ्यात अड. मोहन वाडेकर, अंजुम इनामदार, कवी बाबा जाधव, प्रकाशक मोहिनी कारंडे, अजय कदम, प्रा. अमृतराव काळोखे, इलयास सय्यद, आर.बी. माने, मुकुंद काकडे, हनुमंत टिळेकर, अप्पासाहेब गायकवाड, सुरेश दरवडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सोहळ्याचे समन्वयक मुकुंद काकडे यांनी आभार मानले.
यापुढे अड. मोहन वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी मंडळी समताभूमी परिसरातील ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घेतले. यात लहूजी वस्ताद तालीम, क्रांतिकारक उमाजी नाईक समाधी स्थळ, सत्यशोधक गुरुवर्य बाबुराव जगताप स्मारक, गोविंदराव फुले यांचा मुशी कारखाना यांचा समावेश होता. उपस्थितांना महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना आणि प्रथम झेंडा फडकविल्याची माहितीही सखोलपणे दिली गेली.
रघुनाथ ढोक यांनी सांगितले की पुण्यातील सत्यशोधक कार्यकर्त्यांनी हे ऐतिहासिक स्थळे भेट देऊन त्यांच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहचवणे अत्यंत आवश्यक आहे. अरविंद खैरनार यांनी आवाहन केले की, येत्या रविवारी, २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मुख्य सोहळ्यास सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर, जळगाव, धुळे परिसरातून मोठ्या संख्येने सत्यशोधक मंडळी उपस्थित राहणार आहेत, तसेच पुणे परिसरातील कार्यकर्त्यांनी देखील जास्तीत जास्त उपस्थित राहावे.