आरोग्य सेवेची श्रीगणेशा : लखमापूर गणेश मंडळाचा प्रेरणादायी उपक्रम

लोकदर्शन बाखर्डी : प्रतिनिधी – उमेश राजुरकर

गणेशोत्सवाच्या निमित्ताने फटाके, सजावट व मनोरंजनावर अवाढव्य खर्च करण्याऐवजी समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत जय किसान आदर्श गणेश मंडळ, लखमापूर यांनी ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय उपचार दौऱ्याचे आयोजन केले. महात्मा गांधी आयुर्विद्यान संस्थान, सेवाग्राम (वर्धा) येथे भरविण्यात आलेल्या या शिबिराचा लाभ तब्बल ४३ रुग्णांना मिळाला.

सेवाग्रामकडे रवाना होणाऱ्या रुग्णसेवा बसचे पूजन माजी उपसरपंच मोरेश्वर आस्वले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच अरुण रागीट, पोलिस पाटील संदीप तोडासे, तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाअंतर्गत रुग्णांना विविध आजारांवरील तपासणी, औषधोपचार, लघु शस्त्रक्रिया आणि पुढील उपचारांसाठी आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. सर्व उपचार पूर्णतः विनामूल्य करण्यात आले. सेवाग्रामच्या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना सेवा पुरवली.

मंडळाचे अध्यक्ष आर्यन टोंगे, उपाध्यक्ष अनिकेत उलमाले, सचिव आकाश भोजेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. मंडळाचे सदस्य सचिन आवारी, आदित्य आवारी, किरण चटप, वैभव उरकुंडे, वैभव भोयर, सौरभ जुनघरे, निशांत बोढे, पवन भोयर, अमित केसुरकर, आदित्य जुनघरे, हर्षल केसुरकर, अंकित पारखी, पंकज पोतराजे, अंकित तेलंग, अमर उलमाले, आशिष कौरासे, पवन बोबडे आदींनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

“गरजूंना मदत करणे, आरोग्याची जागृती निर्माण करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबवले जातील,” असा संकल्प आयोजकांनी यावेळी व्यक्त केला.

या उपक्रमाचे विशेष कौतुक ग्रामस्थ व लाभार्थी रुग्णांनी केले असून, लखमापूर गणेश मंडळाचे हे कार्य खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here