लोकदर्शन कोल्हापूर👉राहुल खरात
सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चतुर्थश्रेणी बदली कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) संदर्भातील गंभीर अडचणी व थकबाकी प्रकरणी तातडीने चौकशी करण्याचे आश्वासन प्रादेशिक आयुक्त मा. उमेश बोरकर यांनी दिले.
दिनांक ०८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजता ईपीएफ कार्यालय, कोल्हापूर येथे या संदर्भात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली जिल्हा शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत “मिरज-सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील न्यायालयीन बदली कामगारांचा ईपीएफ फंड जमा का होत नाही?” या महत्त्वपूर्ण प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीदरम्यान, या प्रकरणाचा सविस्तर चौकशी अहवाल सादर करावा, तसेच सांगली येथे जाऊन युनियनचे पदाधिकारी, संबंधित अधिष्ठाता व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून दफ्तर तपासणी करावी, यासाठी ईपीएफ वेल्फेअर इन्स्पेक्टरची तातडीने नेमणूक करण्यात आली आहे. सोमवारपासूनच चौकशीला सुरुवात होणार असल्याचे बोरकर साहेबांनी स्पष्ट केले.
यावेळी शिष्टमंडळाने सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बदली कामगारांना ईपीएफ कायदा लागू करावा तसेच इतर प्रलंबित मागण्यांबाबत लेखी निवेदन सादर केले.
बैठकीला युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, महासचिव अनिल मोरे, कुपवाड शहराध्यक्ष राजरत्न बंदेनवर, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव, सदस्य दऱ्याप्पा कांबळे यांच्यासह हॉस्पिटलमधील कर्मचारी दशरथ गायकवाड, धर्मेंद्र कांबळे, मोहन गवळी, शोभा पोतदार, राकेश कांबळे, सुमन कामत, प्रकाश गायकवाड, बापू वाघमारे, ऋषिकेश कांबळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या तातडीच्या कारवाईमुळे शासकीय बदली कामगारांच्या न्याय्य हक्कांचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.