लोकदर्शन 👉मोहन भारती
चंद्रपूर – वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या कोळसा उत्खननामुळे चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या शेतीचे व आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. नुकसानीच्या पंचनाम्यांसह योग्य तो न्याय देण्यासाठी शासनाने दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी अप्पर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती नुकसानभरपाई संदर्भातील सुधारित धोरण निश्चित करणार आहे.
या निर्णयामागे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुरावा कारणीभूत ठरला आहे. त्यांनी कोळसा उत्खननामुळे होणाऱ्या नुकसानीचे वास्तव शासनाच्या समोर मांडले होते.
कोळसा वाहतुकीच्या धुळीमुळे, स्फोटांमुळे शेतजमिनीचे होणारे नुकसान, पिकांचे घटलेले उत्पन्न, आर्थिक तूट, आरोग्य समस्यां इत्यादी बाबी त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यांच्या या प्रगल्भ आणि अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळेच शेतकऱ्यांच्या व्यथा शासनाच्या दृष्टीस पडल्या आणि तात्काळ कृती घडवून आली.
या विशेष समितीमार्फत शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक मूल्यांकन, पंचनामे, आणि न्याय्य भरपाईसाठी आवश्यक असलेली नवीन कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलपणे विचार करणारे आमदार मुनगंटीवार हे या निर्णयाच्या केंद्रस्थानी होते. वणी व चंद्रपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहून त्यांनी केलेले हे कार्य म्हणजे एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.