लोकदर्शन बल्लारपूर 👉मोहन भारती
बल्लारशाह (चंद्रपूर) – प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चाललेला असतानाच, महाराष्ट्राचे माजी वनमंत्री व विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारशाह रेल्वे स्थानकासाठी स्वतंत्र रेल्वे पोलिस ठाण्याची (GRP स्टेशन) मागणी केली आहे. ही मागणी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बल्लारशाह हे महाराष्ट्र व तेलंगणा सीमेवरील अत्यंत महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून येथे दररोज ३,००० पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. मात्र, येथे सध्या केवळ रेल्वे पोलिस दूरक्षेत्र चौकी (Out Post) कार्यरत आहे. या चौकीचे अधिकार आणि सुविधा मर्यादित असल्यामुळे गंभीर प्रकरणांमध्ये तात्काळ कारवाई शक्य होत नाही.
🛤️ १२० किमीवरील पोलिस ठाण्यावर अवलंबून
सध्या बल्लारशाह येथील रेल्वे सुरक्षेच्या सर्व गंभीर प्रकरणांसाठी वर्धा येथील जीआरपी ठाण्यावर अवलंबून राहावे लागते, जे सुमारे १२० किलोमीटर अंतरावर आहे. परिणामी वेळेत कारवाई न होणे, गुन्हेगार सुटणे, व महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे असे प्रकार घडत आहेत.
♦️ वाढत्या गुन्ह्यांचा संदर्भ
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, चोरी, मारहाणीचे प्रकार तसेच महिलांवरील असभ्य वर्तनाच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. अशा घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
♦️स्थानिकांसाठी मोठी गरज
मुनगंटीवार यांच्या मते, स्वतंत्र पोलिस ठाणे झाल्यास प्रवाशांचे संरक्षण, त्वरित गुन्हा नोंदणी, गस्त वाढ, महिलांच्या सुरक्षेसाठी उपाय यासारख्या बाबींना चालना मिळेल. त्याचप्रमाणे, स्थानकाच्या दर्जामध्येही लक्षणीय सुधारणा होईल.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असून, लवकरात लवकर रेल्वे पोलिस ठाण्याची स्थापना करावी, अशी अपेक्षा नागरिकांमधूनही व्यक्त केली जात आहे.