लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर
कोरपना तालुक्यात 19 मे रोजी झालेल्या जोरदार वादळी वारा आणि मुसळधार पावसाने अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पारडी, अकोला, भोईगुडा, कान्हाळगाव, चनई पारडी आणि मेहंदी या गावांना नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. अनेक घरांची छप्परे उडून गेली असून काही घरांची पडझड झाली आहे. तसेच वीज पोल कोसळल्यामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
अचानक ओढवलेल्या या संकटामुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार देवराव दादा भोंगळे यांनी तात्काळ प्रभावित गावांना भेट देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच प्रशासनाला तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी आमदार भोंगळे यांनी शासनाकडून लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. वादळी वारा आणि पावसामुळे निर्माण झालेली विदारक परिस्थिती पाहून अनेकांचे मन हेलावून गेले.
दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्याचे काम सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार घरांचे, वीज यंत्रणेचे आणि इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
यावेळी भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण मडावी, भाजपा शहरप्रमुख अमोल आसेकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दिनेश खडसे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, पवन बुरेवार, कार्तिक बोनलावार, दिनेश ढेंगळे, रामदास न्याहारे, राजू चौधरी, मनोज तुमराम आदी उपस्थित होते.





