माणिकगड सिमेंट प्रदूषणावर लगाम: नागरिकांच्या आरोग्यासाठी निर्णायक पावले

लोकदर्शन गडचांदूर 👉मोहन भारती

गडचांदूर परिसरात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनी मुळे निर्माण होणाऱ्या गंभीर प्रदूषणाच्या समस्येवर अखेर सकारात्मक हालचाल सुरू झाली आहे. कंपनीकडून येणारा दुर्गंधीयुक्त कचरा आणि सिमेंट वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या धुळीमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता गडचांदूर येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कंपनीचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत कंपनीचे युनिट हेड अतुल कन्सल यांनी माहिती देताना सांगितले की, कचऱ्यामुळे होणारा दुर्गंध मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणण्यात यश आले असून, उर्वरित प्रदूषणावरही ३० एप्रिलपर्यंत पूर्ण नियंत्रण मिळवण्याचे लेखी आश्वासन कंपनीने दिले आहे.

प्रदूषणामुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना खोकला, दमा, डोळ्यांचे आजार अशा समस्यांना सामोरे जावे लागत होते. तसेच शेतीवर धुळीचा थर साचल्याने उत्पादनातही मोठी घट होत होती. या गंभीर परिस्थितीची दखल घेत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.

यापूर्वी २ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली होती, तर २६ फेब्रुवारी रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा मांडण्यात आला होता. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले होते.

सततच्या प्रयत्नांमुळे आणि जनतेच्या दबावामुळे कंपनीने सकारात्मक भूमिका घेतल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे.

बैठकीस विविध लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here