“७९ वर्षांची प्रतीक्षा संपली! आमदार देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला यश; गडचांदूरला १० कोटींचे अत्याधुनिक बसस्थानक मंजूर”

लोकदर्शन गडचांदूर 👉मोहन भारती

गडचांदूर, १ एप्रिल
औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहराच्या विकासाला आज ऐतिहासिक वळण मिळाले असून, आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शहरात १० कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक बसस्थानक उभारण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द त्यांनी अवघ्या एका वर्षात पूर्ण करून दाखवला आहे.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ७९ वर्षे उलटूनही गडचांदूरसारख्या महत्त्वाच्या औद्योगिक शहरात हक्काचे एसटी बसस्थानक नव्हते. त्यामुळे दररोज हजारो प्रवासी, सिमेंट उद्योगातील कामगार, शेतकरी आणि विद्यार्थी यांना उन्हात, पावसात उघड्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत होती. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांची मोठी गैरसोय होत होती. पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये दीर्घकाळ नाराजी होती.

ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार देवराव भोंगळे यांनी निवडून आल्यानंतर या प्रश्नाला प्राधान्य दिले. बसस्थानकासाठी जागेचा प्रश्न मोठा अडथळा ठरत असताना त्यांनी तो मार्गी लावत शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. विधानसभेतही त्यांनी हा मुद्दा ठामपणे मांडून शासनाचे लक्ष वेधले.

या कामासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत राज्य शासनाने विशेष शासन निर्णयाद्वारे या प्रकल्पाला प्रशासकीय व आर्थिक मान्यता दिली आहे.

मंजूर करण्यात आलेले बसस्थानक अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहे. तळमजल्यावर प्रशासकीय कार्यालय, पहिल्या मजल्यावर कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह, भव्य वाहनतळ, पेव्हर ब्लॉक, आकर्षक कुंपणभिंत व प्रवेशद्वार यांचा समावेश असेल. याशिवाय पर्यावरणपूरक उपाययोजना म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंग, तसेच सुरक्षेसाठी अग्निशमन यंत्रणा आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित कक्षाची विशेष तरतूद करण्यात येणार आहे.

याबाबत बोलताना आमदार देवराव भोंगळे यांनी सांगितले की, “गडचांदूर हे या भागाच्या अर्थव्यवस्थेचे केंद्र असून, येथे सुसज्ज बसस्थानकाची आवश्यकता खूप दिवसांपासून होती. या प्रकल्पामुळे वाहतूक व्यवस्था सुधारेल, प्रवाशांना सुविधा मिळतील आणि शहराच्या विकासाला चालना मिळेल.” त्यांनी पुढे सांगितले की, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल.

या निर्णयामुळे गडचांदूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली निघाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आमदार देवराव भोंगळे यांनी दिलेला शब्द पाळल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. येणाऱ्या काळात हे बसस्थानक गडचांदूरच्या प्रगतीत आणि सौंदर्यात मोठी भर घालणारे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here