गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला पुण्यात कर्तृत्ववान महिलांचा दिमाखदार सत्कार

लोकदर्शन पुणे 👉 गुरुनाथ तिरपणकर

विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात दिनांक 18 मार्च 2026 रोजी जनजागृती सेवा संस्था, ठाणे-बदलापूर यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त एक भव्य आणि देखणा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम नऱ्हे रोड, धायरी फाटा येथील कै. सौ. शालन शिवराम चव्हाण सभागृह, रितिका कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात पुण्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान आणि सेवाभावी महिलांचा गुणगौरव करण्यात आला. शिक्षण, साहित्य, उद्योग, कला, क्रीडा, वैद्यकीय, कायदा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आम्रपाली मोहिते (व्यसनमुक्ती समुपदेशक), ॲड. अनिशा फणसळकर (ज्येष्ठ विधीज्ञ), प्रा. डॉ. भाग्यश्री जोगदेव (साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ), रेशा अभ्यंकर (मानसोपचार तज्ज्ञ), ज्योती नाळे (संपादिका, दैनिक संध्या पुणे), शिवराम चव्हाण (डायरेक्टर – ॐग्रामण्ये इन्स्टिट्यूट), ॲड. सचिन देवांग (संस्थापक – कोष्टी व्हिजन ट्रस्ट), श्री. रामजित गुप्ता (मुख्य तपास अधिकारी, अँटी पायरोसी सेल) आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, सचिव सौ. संचिता भंडारी, खजिनदार दत्ता कडूलकर, उपाध्यक्ष महेश्वर तेटांबे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्त्री सक्षमीकरण, स्त्री-पुरुष समानता, समाजातील स्त्रियांची भूमिका आणि महिलांनी स्वबळावर प्रगती करण्याचे महत्त्व यावर प्रभावी विचार मांडले.

यानंतर मुख्य सत्कार सोहळा पार पडला. सत्कारार्थी महिलांना शाल, गुलाबपुष्प, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि आकर्षक पेन देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मानाने उपस्थित महिलांच्या कार्याची दखल घेत समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या गेल्या पाच वर्षांतील कार्याचा आढावा घेतला व पुढील उपक्रमांविषयी माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच सौ. तिरपणकर, शिवराम चव्हाण व इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमानंतर उपस्थितांनी अशा उपक्रमांचे कौतुक करत संस्थेचे अभिनंदन केले. जनजागृती सेवा संस्थेचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून अशा उपक्रमांमुळे महिलांना प्रोत्साहन मिळते, असे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. संचिता भंडारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष महेश्वर तेटांबे यांनी केले.

जनजागृती सेवा संस्थेचे कार्य भविष्यातही असेच वृद्धिंगत होवो, अशा शुभेच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here