यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्काराने अविनाश पोईनकर सन्मानित ⚜️ ‘दंडकारुण्य’ कवितासंग्रहाची दखल

By : Shankar Tadas
चंद्रपूर :

पुणे येथील स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्रमंडळाच्या वतीने मागील ४० वर्षांपासून दिला जाणारा महाराष्ट्रातील प्रतिष्ठित ‘यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार’ यंदा चंद्रपूर येथील युवा कवी, सामाजिक संशोधक व कार्यकर्ते अविनाश पोईनकर यांच्या ‘दंडकारुण्य’ या बहुचर्चित कवितासंग्रहाला प्रदान करण्यात आला. पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नाटककार व अभिनेते पद्मश्री सतीश आळेकर आणि आ.सुनील टिंगरे यांच्या हस्ते, प्रख्यात वात्रटिकाकार रामदास फुटाणे, कवी अशोक नायगावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रोख ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह देऊन पोईनकर यांना सन्मानित करण्यात आले. सोबतच सिनेअभिनेते महेश कोठारे, ‘रानमाणूस’ म्हणून परिचित प्रसाद गावडे, प्रदीप सिद्धभट्टी आणि प्रतिभा खैरनार यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लोकवाङ्मय गृह, मुंबई प्रकाशित ‘दंडकारुण्य’ हा अविनाश पोईनकर यांचा कवितासंग्रह राज्यभर चर्चेत आहे. दंडकारण्यातील पोलीस, नक्षल आणि भांडवलदार यांच्यामध्ये अडकलेल्या आदिवासींच्या अस्तित्वाच्या संघर्षासह जल-जंगल-जमीन या प्रश्नांवर भाष्य करणारी त्यांची कविता विशेष दखलपात्र ठरली आहे. यापूर्वी या कवितासंग्रहाला प्रतिष्ठित कविवर्य ना.धो. महानोर साहित्य पुरस्कारही प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानातून त्यांचा ‘उजेड मागणारी आसवे’ हा कवितासंग्रह, ‘प्रा. विमल गाडेकर : व्यक्ती आणि वाङ्मय’ हा संपादित ग्रंथ आणि ‘सुरजागड : विकास की विस्थापन?’ हा सामाजिक संशोधन ग्रंथ प्रकाशित आहे. त्यांच्या कवितेचा संभाजीनगर येथील स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा प्राप्त देवगिरी महाविद्यालयाच्या पदवी अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here