पनवेलमध्ये साहित्याचा जागर; रघुनाथराव ढोक यांचा विशेष सत्कार लोकदर्शन नवी l

लोकदर्शन नवी पनवेल: 👉रघुनाथ ढोक

कोकण मराठी साहित्य परिषद (शाखा पनवेल) आणि पंचशील तरुण मंडळ (सावरगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल रघुनाथराव ढोक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ श्रीपती डोलारे यांच्या ‘मानवतेचे सिंहासन’ आणि ‘लावण्यलेणी’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने हा गौरव सोहळा पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त आणि रायगड भूषण मा. प्रा. एल. बी. पाटील यांनी भूषवले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा न्यायाधीश मा. डॉ. यशवंत चावरे, विद्रोही कवी मा. प्रा. राहुल तागडे, ह्युमन राईट्स ॲक्ट इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निवृत्त न्यायाधीश मा. शिवदास महाजन तसेच माजी शिक्षण सहसंचालक मा. रोहिदास पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी रघुनाथराव ढोक यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव करताना त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले. ‘मानवतेचे सिंहासन’ या पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणे समाजात मानवता जपणारी माणसे निर्माण होणे आवश्यक असून, रघुनाथराव ढोक हे त्यापैकीच एक असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात पुस्तक प्रकाशनासोबत खुले कविसंमेलनही आयोजित करण्यात आले होते. विविध कवींनी आपल्या कवितांमधून सामाजिक वास्तव आणि मानवी मूल्यांवर भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. हरिश्चंद्र फडके यांनी केले.

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ साहित्यिक ॲड. सुनिता जोशी, मा. नागनाथ डोलारे, अर्चना डोलारे आणि सुभाष कुरणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

रघुनाथराव ढोक यांच्या या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, हा गौरव त्यांच्या भावी वाटचालीस प्रेरणादायी ठरेल, अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवर व नागरिकांनी व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here